डोंबिवली: एका विवाहितेची भरदिवसा दगडाने ठेचून हत्या (murder) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण- पश्चिम परिसरातील हायप्रोफाईल लोकवस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधारी भागातील रस्त्यावर विवाहितेची दगडाने ठेचून हत्या झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
हत्येच्या संशयाची सुई विवाहितेच्या पसार झालेल्या पतीवर असून पोलिसांनी त्या दिशेने तपासाला वेग दिला आहे.
लक्ष्मी जनार्दन मोहिते (वय २५, रा. सावदगाव, ता. भिवंडी) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
कल्याण- पश्चीमेकडे हायप्रोफाईल लोकवस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधारीपासून ते टिटवाळ्यापर्यंत रिंगरोडचे काम सुरु आहे. याच रस्त्यावर सोमवारी (दि. ६) रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एका महिलेचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
या प्रकाराची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या भागातील काहींची प्राथमिक चौकशी केली. मात्र, कोणताही धागा-दोरा हाती आला नाही. लक्ष्मी ही हायप्रोफाईल गांधारी परिसरातल्या सोसायट्यांमध्ये जाऊन घरकाम करून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. लक्ष्मीची हत्या तिचा पती जर्नादन मोहिते याने केली असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. हत्येनंतर तो बेपत्ता झाला आहे.
लक्ष्मीची हत्या दगडाने ठेचूनच का व कोणत्या कारणासाठी करण्यात आली? याचे कारण अद्यापही पोलिसांना समजू शकले नाही. मृत लक्ष्मीचा पती जनार्दन हा ताब्यात आल्यानंतरच हत्येचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे खडकपाडा पोलिस ठाण्याचे सिनिअर इन्स्पेक्टर अशोक पवार यांनी सांगितले.