पुणे: पुण्यातील वानवडी परिसरात रिक्षातून अपहरण करुन एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. सामूहिक बलात्कार प्रकरणी वानवडी पोलिसांनी ७ संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. मागील आठवड्यात दत्तवाडी परिसरात एका महिलेवर सामूहीक अत्याचार केल्याची घटना घडली होती.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, १४ वर्षाची मुलगी एका ठिकाणी थांबली असताना रिक्षातून आलेल्या आरोपींनी तिला रिक्षात बसवून अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. त्यानंतर तिच्यावर आरोपींनी एका पाठापोठ बलात्कार केला.
या घटनेची मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार करण्यात येत असल्याचे समजते.
या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. त्यांना आता न्यायालयात नेले असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
ही घटना गंभीर असल्याने याबाबत संपूर्ण कारवाई पूर्ण झाल्यानंतर अधिकृत माहिती दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.