एका समाजसेवकाच्या दक्षतेमुळे मुलांना विकत घेऊन भिकारी बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. मुकुंदवाडीतील माय-लेकींनी अकोला आणि जालना येथून बाँडवर पाच आणि दोन वर्षांच्या दोन चिमुकल्यांना विकत आणून भीक मागायला लावले.
धक्कादायक म्हणजे, चिमुकल्यांनी काम न केल्यास या महिला त्यांना बेदम मारहाण करायच्या. माणुसकीला काळिमा फासणारा हा प्रकार बुधवारी (दि. १) उघडकीस आला. मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपी माय-लेकींना अटक केली आहे. मात्र, त्यांनी मुले दत्तक घेतल्याचा दावा केला आहे. जनाबाई उत्तम जाधव आणि सविता संतोष पगारे (दोघी रा. रामनगर, मुकुंदवाडी) अशी आरोपी महिलांची नावे आहेत.
मुकुंदवाडी, संजयनगर येथे राहणारे देवराज नाथाजी वीर हे समाजसेवक आहेत. त्यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार गुरुवारी १ सप्टेंबर रोजी दुपारी फिर्यादीला नातेवाईक महिलेने फोन करून माहिती दिली की, रामनगरात राहणार्या जनाबाई जाधव व तिची मुलगी सविता पगारे या दोघी त्यांच्या ताब्यात असलेल्या मुलाला लाकडी लाटण्याने बेदम मारहाण करीत आहेत.
त्यावरून वीर यांनी रामनगर गाठून मुलाला आरोपी महिलांच्या ताब्यातून सोडविले आणि ही माहिती पोलिसांना दिली. पाच वर्षांच्या भिकारी मुलाने या महिलांची संपूर्ण कर्मकहाणी पोलिसांना सांगितली.
आरोपी महिलांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मांजरेकर यांनी दोन्ही महिला आरोपींना ४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बिंग फुटल्यावर पोलिस निरीक्षक मनोज पगारे आणि समितीने आरोपी सविता पगारे हिची चौकशी केली. तिने सांगितले की, पीडित तरुणाला त्याच्या आई-वडिलांकडून ५५ हजारांना विकत घेतले आहे.
तसेच जालन्यातील एका दोन वर्षीय मुलाला देखील त्याच्या आई वडिलांकडून एक लाख रुपयांत दत्तक म्हणून विकत घेतले आहे. तसा शंभर रुपयांच्या बाँड पेपर व लेखी करारनामा देखील केला असल्याचे सविताने सांगितले. तर दोन्ही पीडित बालकांना बाल निरीक्षणगृहात दाखल केले आहे.
काम न केल्यास (भिकारी) आरोपी महिला चिमुकल्यांना मारहाण करायच्याच; मात्र त्यांना जेवणदेखील दिले जात नव्हते. त्यामुळे पाच वर्षीय मुलगा बाहेर पडायचा आणि कचर्यातील पोळ्या बाजूला काढून खायचा. हा प्रकार गल्लीतील अनेक महिलांनी पाहिला होता.
त्याहून काळीज पिळवटून टाकणारा प्रकार म्हणजे, या दोघी आरोपी महिला मुलांना बाथरूमच्या दारात मच्छरांमध्ये झोपायला लावायच्या. त्यांच्याकडून टॉयलेट साफ करून घ्यायच्या, असा प्रकार समोर आला आहे.
मुकुंदवाडी पोलिसांनी दोन्ही महिलेसह पीडित पाच वर्षीय मुलाला पोलिस ठाण्यात आणले. तेथे बाल संरक्षण कक्षाच्या अधिकारी अॅड. सुप्रिया इंगळे आणि त्यांच्या सहकार्यांनी मुलाची विचारपूस केली. या महिलेने माझ्या मम्मी-पप्पांकडून विकत आणले. भीक मागायला न गेल्यास ती मारते, घरातील कामे सांगते, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करते, असे चिमुकला बोलू लागला. त्यामुळे या प्रकरणाचा भांडाफोड झाला.