गर्भवती महिलांना हेरायचे आणि त्यांना मोठ्या रकमेचे आमिष देऊन अपत्य जन्माला येताच नवजात शिशुची विक्री करायची आणि त्यातून लाखो रुपये कमवायचे असा व्यवसाय करणाऱ्या एका रॅकेटचा गुजरात येथील खेडा जिल्ह्यातील पोलिसांनी भांडाफोड केला आहे. सदर गुन्ह्यात चार महिलांना अटक करण्यात आली असून यात पाच दिवसाच्या बाळंतीणीचा देखील समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील तीन महिलांच्या टोळीने एका गरीब कुटुंबातील गर्भवती महिलेला तिचे बाळ दीड लाख रुपयात विकून देण्याचे आमिष दाखवून खेडा जिल्ह्यातील नाडियाड येथे आणले होते. तिला बाळ होताच त्याची विक्री करण्याचा त्यांचा प्लॅन होता. पोलिसांनी सुगावा लागताच सापळा रचला आणि नवजात बाळाची सुटका करून त्याच्या आईसह चारही महिलांना अटक केली. अटकेतील महिले महिलांमध्ये नवजात बाळाची आई राधिका राहुल गेडाम, मोनिका महेश शाह , पुष्पा संदिप पटेलिया आणि माया लालजी दाबला यांचा समावेश आहे.
गुजरात पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सदर महिलांच्या रॅकेटमधून बाळांची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना गुप्त सूत्रांच्या माध्यमातून मिळाली होती. त्यामुळे सापळा रचून पोलिसांनी एक नकली ग्राहक पाठवले आणि चर्चा झाल्यानंतर आरोपी महिला सहा लाख रुपयांना बाळ विकण्यास तयार झाली. पोलिसांनी तीन महिलांना अटक केली आहे तर बाळंतीन असलेली महिला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
नागपूरची माया हीच निघाली मास्टरमाईंड
गुजरात पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार माया नामक महिला नागपूरची असून तीच या रॅकेटची मास्टरमाइंड असल्याचा पोलिसांचा दावा आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ती नाडियाडमध्ये स्थायिक आहे. या महिलेच्या विरोधात अनेक कलमाअंतर्गत याआधी देखील गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. माया हिने उभे केलेल्या या रॅकेटने आत्तापर्यंत तीन बाळांना विकल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे . रॅकेटमधील महिला फक्त गरीब महिलांनाच बाळांच्या विक्रीसाठी हेरतात की त्यांच्याकडून इतरही मार्गाने गर्भधारणा देखील करून घेतात याचा तपास पोलीस घेत आहेत. महिला आणि विकलेल्या मुलांची डीएनए चाचणी करून याचा शोध घेण्यात येणार आहे.