अकोला(प्रतिनिधी)- “कोरोनाचे आलेले संकट लवकर जाऊ दे” अशी साद घालत शिवभक्तांकडून श्री राजराजेश्वरला बंद दरवाजा बाहेरूनच जलाभिषेक करीत साकडे घातले.
सलग दुसऱ्या वर्षी जगभरात प्रसिद्ध असलेली अकोला येथील पालखी-कावड यात्रेवर कोरोनाचे सावट दिसून येत आहे. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता अद्याप मंदिराचे दरवाजे बंद आहेत. त्याबरोबरच अद्याप अकोला येथील प्रसिद्ध पालखी-कावड यात्रा परवानगी बाबत निर्णयात अजून प्रलंबित आहेत.
मागील वर्षी श्री राजराजेश्वरला जलाभिषेकाची परंपरा खंडित झाली होती. जलाभिषेकाची परंपरा सलग दोन वर्ष खंडित होऊ नये म्हणून डाबकी रोड वरील शिवभक्तांनी तिसऱ्या सोमवारी केवळ एक भरणे गांधीग्राम येथून पैदल आणून श्री राजराजेश्वरला बंद दरवाजा बाहेरूनच जलाभिषेक केला. या कावड मध्ये अभिषेक देशमुख, मयूर धारस्कर, शुभम भाकरे, पियुष अढाऊ, आशिष सोनोने, वैभव ठाकरे, यश बुंदे या शिवभक्तांचा सहभाग होता.