काबूल : अफगाणिस्तान येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. काबूल विमानतळाजवळून शनिवारी सकाळी १५० नागिरकांचे तालिबान्यांनी अपहरण केले आहे. यात बहुतांश भारतीय नागरिकांचा समावेश आहे. अफगाणिस्तान मधील स्थानिक मीडियाने या घटनेची पुष्टी केली आहे.
तालिबान्यांनी अपहरण केलेल्यांमध्ये भारतीयांसह अफगाणिस्तानात राहणाऱ्या शिख नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांचे काबूल मधील हामिद करजई विमानतळाजवळून अपहरण करण्यात आले आहे. दरम्यान, तालिबानने अफगाण मीडियाकडे बोलताना भारतीयांचे अपहरण केलेल्या वृत्ताचे खंडन केले आहे.
अफगाणिस्तानमध्ये अनेक भारतीय अडकून पडले आहेत. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर अनेकांनी अफगाणिस्तान सोडून जाण्यास सुरुवात केली आहे. भारतीयांना सुरक्षित मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. याच दरम्यान तालिबान्यांनी भारतीयांचं अपहरण केले आहे.
दरम्यान, आज सकाळी साडे दहा वाजता ८५ भारतीयांना घेऊन हवाई दलाच्या सी-१३० जे विमानाने उड्डाण केले आहे. हे विमान काही वेळात भारतात दाखल होणार आहे. आणखी २०० भारतीयांना आणण्याची तयारी केली जात आहे.
काबूल येथील भारतीय दुतावासातील सर्व अधिकाऱ्यांना भारतात आणण्यात आले आहे. पण काबूल सह दुसऱ्या शहरांत अजूनदेखील १ हजार भारतीय अडकून पडले असल्याचा अंदाज आहे. विदेश मंत्रालय त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. कारण अजून काही लोकांनी भारतीय दुतावासाशी संपर्क केलेला नाही.
गेल्या मंगळवारी १२० हून भारतीयांना मायदेशात आणण्यात आले होते. यात काबूल येथे भारतीय दुतावासातील अधिकारी, आयटीबीपीचे जवान आणि अन्य लोकांचा समावेश होता. याआधी सोमवारी ४५ लोकांना एयरलिफ्ट करण्यात आले होते.
तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर अफगाणिस्तानमधून पलायन केलेले माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांचे बंधू हशमत घनी हा तालिबानमध्ये सहभागी झाला आहे. हशमत घनी याचा सहभागामुळे तालिबानला बळ मिळेल, असे मानले जात आहे.