नवी दि्ल्ली: कोरोनाच्या परिस्थितीत आर्थिक अडचणींना खूप सामोरं जावं लागत आहे. प्रत्येकाला पैशांची गरज भासत आहे. अशावेळी कुणी नातेवाईकांकडून, कुणी बॅंकेकडून (Bank), तर कुणी सावकराकडून कर्जाने पैसे घेऊन आपली नड भागवतं.
पण, यामध्ये आणखी एक सुविधा आहे, ज्याच्याद्वारे तुम्ही पैशांची गरज सोडवू शकता. यासाठी कुठलाही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तर, या बॅंकिंग सुविधेचं नाव आहे ‘ओव्हरड्राफ्ट सुविधा’. तुम्हाला जर वेतनधारक असला, तर सॅलरी ओव्हरड्राफ्ट सुविधेचा फायदा मिळू शकतो.
ओव्हरड्राफ्ट सुविधा काय आहे?
तुम्ही पगारधारक असाल, तर सर्वात पहिल्यांदा ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी तुम्ही पात्र आहात की, नाही तपासून पहा. जर तुम्ही बॅंकेच्या नियमानुसार पात्र ठरत असाल तर तुम्हाला या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.
तर, सॅलरी ओव्हरड्राफ्ट हे एकप्रकारचे क्रेडीट असते. तुम्हाला केवळ सॅलरी अकाऊंटमध्येच ते मिळते. तुमच्या खात्यात शून्य रक्कम शिल्लक असली तरी, तुम्ही पैसे काढू शकता. त्याला इन्स्टंट लोन असंही आपण म्हणू शकतो. पण, यावर तुम्हाला व्याज द्यावे लागते. प्रोसेस फिदेखील द्यावी लागते.
कुणाला ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते?
ही सुविधा सर्वांनाच मिळत नाही. संबंधित बॅंक ही ग्राहकाचे आणि कंपन्यांचं क्रेडिट प्रोफाईल पाहेत आणि नंतर ओव्हरड्राफ्ट सुविधा द्यायची की नाही, याचा निर्णय घेते. तुम्हाला ओव्हरड्राफ्ट सुविधा हवी असेल, तर बॅंकेशी किंवा कस्टमर केअरशी संपर्क करून माहिती विचारू शकता.
या सुविधेच्या फायद्याचा विचार केला, तर लक्षात येतं की, ही सुविधा तात्पुरती आर्थिक गरज भागविण्यासाठी महत्वाची ठरते. समजा, तुमचा चेक बाऊन्स होणार असेल किंवा ईएमआय जाणार असेल, पण तुमच्या खात्यात पुरेसे पैसे नाही. अशावेळी ओव्हरड्राफ्ट सुविधा कामी येते.
याचं व्याज विचारात घेतलं तर, तुम्ही घेतलेल्या रकमेवर दरमहा १ ते ३ टक्क्यांपर्यंत व्याज द्यावं लागतं. म्हणजेच काय याचं वार्षिक व्याज १२ ते ३० टक्क्यांपर्यंत हे व्याज जातं. बॅंकेच्या (Bank) क्रेडीट कार्डसारखंच या योजनेलादेखील जास्त व्याज द्यावं लागतं.