अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीचा नव्याने उदय झाला आहे. मौलवी हिब्तुल्लाह अखुंदजादा याला अफगाणिस्तानचा अमीर-अल-मोमिनीन अर्थात राष्ट्रपती म्हणून घोषित करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनासह संसद आणि सरकारी कार्यालयांवर तालिबानने कब्जा केला आहे. संपूर्ण देशात अराजक माजले असताना, तालिबानी राजवटीची सत्तासूत्रे कोणाकडे सोपवली जाऊ शकतात त्यांची नावे समोर आली आहेत.
हिब्तुल्लाह अखुंदजादा : फतव्यांचा मास्टर
अरबी भाषेत हिब्तुल्लाहचा अर्थ ईश्वरी भेट! आतापर्यंत त्याच्या वाटचालीवरून तो आपल्या नावाच्या उलटा वागला असल्याचे समोर आले आहे. त्याला फतव्यांचा मास्टर म्हणून ओळखले जाते. शरिया अदालतचा मुख्य न्यायाधीश झाल्यानंतर त्याने अनेक फतवे काढले. अनैतिक संबंध ठेवणार्यांची हत्या आणि चोरी करणार्यांना हात तोडण्याची शिक्षा त्याने दिली आहे. सर्वात कू्रर कमांडर म्हणून त्याचा बदलौकिक आहे. त्यामुळे त्याच्या नावाला कितपत पसंती मिळेल, याबद्दल शंकाच आहे.
मुल्ला अब्दुल गनी बरादार : शांततादूत
तालिबानचे एकत्रीकरण करण्यात मुल्ला अब्दुल गनी बरादार याचे मोठे योगदान आहे. तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर याचा उजवा हात म्हणून त्याला ओळखले जात होते. 2001 मध्ये अमेरिकच्या हल्ल्यावेळी तो अफगाणिस्तानचा संरक्षणमंत्री होता. 2010 मध्ये अमेरिका आणि पाकिस्तानने एका कारवाईत त्याला अटक केली होती. त्यावेळी अफगाण सरकारने त्याच्या सुटकेची मागणी करत शांतता चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर त्याची सुटका झाली. तो शांतीच्या चर्चेचे समर्थन करत आला आहे.
मुल्ला महम्मद याकूब : संस्थापकाचा मुलगा
तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर याचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाल्यानंतर त्याचा मुलगा मुल्ला महम्मद याकूब समोर आला. त्याने हिब्तुल्लाह अखुंदजादा तालिबानचा म्होरक्या झाल्याचे समर्थन केले होते आणि त्यानंतर याकूब गायब झाला होता.
यावर्षी 29 फेब्रुवारीला अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांततेवर चर्चा झाल्यानंतर याकूबचे नाव चर्चेत आले. त्याला विंग कमांडर करण्यात आले. आता तो कमांडर आहे. तालिबानी नेत्यांमधील सर्वात मवाळ नेता म्हणून त्याची ओळख आहे.
सिराजुद्दीन हक्कानी : नेटवर्क मास्टर
सिराजुद्दीन हक्कानी कमांडर जलालुद्दीन हक्कानीचा मुलगा आहे. वडिलाने तयार केलेल्या नेटवर्कची तो धुरा सांभाळतो. हे नेटवर्क पाकिस्तानी सीमेवरील तालिबानच्या आर्थिक आणि मिलिटरीच्या संपतीची देखरेख करते. अफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ल्यांची सुरुवात हक्कानी याने सुरुवात केल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हक्कानी याने तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हामीद करझाई यांच्या हत्येचा कट रचला होता. तसेच त्याने अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासावरही आत्मघातकी हल्ला केला होता.
मुल्ला अब्दुल हकीम : शरियतचा जाणकार
अब्दुल हकीम तालिबानी शांतता समितीचा सदस्य आहे. तालिबानच्या शासन काळात मुख्य न्यायाधीशाची जबाबदारी त्याने समर्थपणे पार पाडली होती. तालिबानच्या शक्तिशाली धार्मिक संस्थेचा तो सध्या प्रमुख आहे. तालिबानचा प्रमुख म्होरक्या हिब्तुल्लाह अखुंदजादा हकीम त्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवत असल्याचे मानले जाते. शरियत कायद्याचा जाणकार म्हणूनही त्याला ओळखले जाते. राज्य कारभार करताना अब्दुल हकीम समतोल भूमिका घेऊ शकतो, असा जाणकारांचा होरा आहे.