अकोला: दि.१७ कोविडच्या पार्श्वभुमिवर कावड यात्रोत्सव साजरा करण्याबाबत आज शिवभक्त मंडळांनी प्रशासनाला आपल्या सुचनांचे निवेदन सादर केले. हे निवेदन जिल्हा प्रशासनाने स्विकारले असून हे निवेदन तातडीने मार्गदर्शक सुचनांसाठी गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. तूर्त, जिल्हा प्रशासन हे गेल्या वर्षी ज्या पद्धतीने जलाभिषेक करण्यात आला त्या पद्धतीवर कायम आहे,असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.
यासंदर्भात पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी शनिवारी (दि.१४) रोजी घेतलेल्या बैठकीच्या वेळी दिलेल्या निर्देशानुसार, आज कावड पालखी मंडळे व जिल्हा प्रशासन यांची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी निमा आरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, तसेच पोलीस दलातील अधिकारी व कावड पालखी सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष राजेश भारती तसेच मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापले म्हणणे प्रशासनासमोर मांडले. तसेच हा उत्सव कोविड नियमांचे पालन करुन कसा पार पाडता येईल याबाबत त्यांनी केलेल्या सुचनांचे निवेदनही जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांना देण्यात आले. त्यानंतर हे निवेदेन प्रशासनाने स्विकारले असून स्थानिक स्तरावर निर्णय घेणे शक्य नसल्याने हे निवेदन मंत्रालयात गृह विभागाला तात्काळ पाठविण्यात येईल. यावर मार्गदर्शन मागविण्यात येईल.
कावड पालखी यात्रोत्सव साजरा करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरुन येणाऱ्या सुचना मंडळांना तात्काळ कळविण्यात येतील. तूर्त, जिल्हा प्रशासन मंडळांना कोणत्याही बाबतीत आश्वस्त करीत नाही. हा उत्सव गेल्या वर्षी ज्या पद्धतीने साजरा झाला, त्या पद्धतीने साजरा व्हावा, यावर प्रशासन कायम आहे,असे प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्पष्ट केले.