अकोला: दि.१७ नवनियुक्त जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे स्वागत आणि हिंगोलीचे जिल्हाधिकारी तथा अकोल्याचे माजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निरोप देण्यासाठी आयोजित समारंभात एरवी रुक्ष वाटणाऱ्या प्रशासनातील हळवे क्षण प्रकटले आणि मान्यवर वक्त्यांनी व्यक्त केलेल्या सद्भावनांच्या ‘श्रावणधारांची बरसात’ होऊन त्यात उपस्थित चिंब झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (दि.१६) सायंकाळी करण्यात आले. गेली अडीच वर्षे अकोल्याच्या प्रशासनाच्या रथाचे सारथ्य करणारे जितेंद्र पापळकर यांची बदली झाली आणि अकोल्यात मनपा आयुक्त असणाऱ्या निमा अरोरा यांच्या कडे जिल्हाधिकारी पदाची सूत्रे आली.
या दोन्ही अधिकाऱ्यांचे स्वागत व निरोप समारंभ संयुक्तपणे आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, जिल्हाधिकारी निमा अरोरा, हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, श्रीमती सुप्रिया पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपवनसंरक्षक अर्जूना, उपसंचालक आरोग्य डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार,निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, ऑफिसर्स क्लबचे रमेशप्रसाद अवस्थी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी जितेंद्र पापळकर यांना हृद्य सत्कार करुन निरोप देण्यात आला तर निमा अरोरा यांचे स्वागत करण्यात आले. जितेंद्र पापळकर यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारी जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेली चित्रफितही यावेळी दाखवण्यात आली.
आपल्या सत्काराला उत्तर देतांना पापळकर म्हणाले की, माझ्या कार्यकाळात जिल्हाधिकारी पदाद्वारे जिल्ह्यातील जनतेला अधिकाधिक न्याय देण्याचा प्रयत्न केला. अकोल्यात सर्व सहकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली. कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत साऱ्यांनी खूप मेहनत घेतली. आरोग्य, पोलीस, महापालिका, महसूल अशा सर्वच यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत होत्या. अकोल्याची जनता समंजस आहे. संकटाच्या प्रसंगी एकत्र येणे ही अकोल्याची खासीयत असल्याचे पापळकर यांनी सांगितले. आपल्याला नाट्यगृहाचे काम पूर्ण करायचे होते, ते करता आले नाही याची खंत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. तिसऱ्या लाटेचा धोका कायम असून साऱ्यांनी मास्क वापरा, परस्पर अंतर राखा व हात धुण्याची सवय कायम ठेवा, असा संदेशही त्यांनी दिला.
निमा अरोरा म्हणाल्या की, ह्या पदाची जबाबदारी सांभाळतांना सर्वांना सोबत घेऊन काम करायचे आहे. त्यासाठी साऱ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. जिल्हाधिकारी पदाची खूर्ची ही जिल्ह्याच्या विकासाला दिशा देऊ शकते, याची मला जाण आहे. त्यामुळे ते पद महत्त्वाचे आहे, त्याचा उपयोग जिल्ह्याच्या विकासासाठी करण्याचा आपला प्रयत्न असेल,असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पापळकर यांच्या कारकीर्दीबद्दल गौरवोद्गार काढले व श्रीमती अरोरा यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी संघटना व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व शासकीय विभागप्रमुख, महसूल प्रशासनातले अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आशिष उमाळे यांच्या बासरी वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश अंधारे यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. निलेश अपार यांनी केले.