आयटी आणि एव्हिएशन कंपन्यांचा पुढाकार; १५ कोटींची जमीन खरेदी
नागपूर : विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिहानला दीड दशकानंतरही हवी तशी गती मिळू शकली नसली तरी करोना काळात सर्वत्र मंदी असताना आयटी आणि एव्हिएशन कंपन्यांनी येथे गुंतवणूक केली आहे.
मिहानमध्ये विशेष आर्थिक क्षेत्र आणि विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर असे दोन भाग आहेत. येथून विमानाने कार्गोची वाहतूक करणे हा मूळ उद्देश या प्रकल्पाचा आहे. परंतु अजूनही त्यादृष्टीने विमानतळ विकसित झालेले नाही. तसेच अनेक उद्योजकांनी जमीन घेऊन प्रकल्पाला सुरुवात केली नाही. काहींनी प्रकल्प अर्धवट ठेवले आहेत. दरम्यान, करोनामुळे जगभर मंदी होती. गुंतवणूक थंडावली होती. अशाही स्थितीत मिहानमध्ये मात्र आयटी कंपन्या आणि एव्हिएशन कंपन्यांनी गुंतवणूक केली. शिवाय शहरातील अंजनी लॉजिस्टिक्स प्रा. लि. कंपनीने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड नर्सिग होमसाठी मिहानध्ये भूखंड खरेदी केला. या कंपनीने ०.३ एकर जमीन घेतली आहे. त्यामुले एम्सनंतर नवीन वैद्यकीय सुविधा येथे उपलब्ध होणार आहे.
आयटी क्षेत्रातील पर्सिस्टंट टेक्नॉलॉजी आणि विमानसेवा क्षेत्रातील कल्पना सरोज एव्हिएशनने येथे जमीन खरेदी केली आहे. पर्सिस्टंट टेक्नॉलॉजीला १३ हेक्टर, कल्पना सरोज एव्हिएशनला १ एकर आणि आरोग्य क्षेत्रातील अंजनी लॉजिस्टिकला ०.३० हेक्टर जमिनीचे वाटप झाले आहे.
या तिन्ही कंपन्यांनी आतापर्यंत १५ कोटींची जमीन खरेदी केली आहे. त्यात अंदाजे ५०० कोटींची गुंतवणूक आणि दीड हजार लोकांना रोजगार मिळणे अपेक्षित आहे.
येथे आधीपासून एअर इंडियाचे विमान देखभाल दुरुस्ती केंद्र (एमआरओ) आहे. शिवाय धीरूभाई अंबानी एअरोस्पेस, कल्पना एव्हिएशन आणि थॅल्स कंपन्यांची गुंतवणूक आहे. यासोबतच एलन एअरक्रॉफ्ट रेडिओ-अंदामर या कंपनीने गुंतवणूक केली आहे. या कंपनीने ३० एकर जागा खरेदी केली आहे. ते येथे लहान विमानांची देखभाल-दुरुस्ती करीत आहेत. त्यामुळे मिहान आयटी सोबत एव्हिशन हब होण्याचे दिशेने पाऊल पडले आहे. यासंदर्भात एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर म्हणाले, आयटी नंतर एव्हिशनवर लक्ष केंद्रित केले जात आहे. रिलायन्स-द सॉल्त (द्राल) फॉल्कन तयार करीत आहे. आता इंदमारचा एमआरओ सुरू झाला आहे. टीएलएसएल, कल्पना एव्हिएशन आले आहे.
कल्पना एव्हिएशन वैमानिक प्रशिक्षण देणार आहे. याशिवाय आयटी कंपनी एचसीलएलची विस्तार योजना आहे. त्यामुळे मिहानमध्ये आयटी आणि एव्हिएशन हब निर्माण होईल, असा विश्वासही कपूर यांनी व्यक्त केला.