काबूल: तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तान मधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. तालिबान्यांनी हाहाकार माजवल्यामुळे अफगाणिस्तान येथील लोक देश सोडून पळून जात आहेत. मात्र, अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला महापौर जरीफा गफारी यांनी आव्हानात्मक पवित्रा घेतला आहे.
जरीफा गफारी यांनी देशात सुरू असलेल्या हाहाकारवर चिंता व्यक्त केली आहे. मात्र, त्यांनी न डगमगता तालिबान्यांना खुले आव्हान दिले आहे. एका वृत्तसंस्थेल्या दिलेल्या मुलाखतीत जरीफा बोलत होत्या.
‘मी वाट पाहत आहे. तालिबान्यांनी यावे आणि माझ्यासह अन्य लोकांची हत्या करावी.’ असे आव्हान त्यांनी यावेळी दिले आहे.
मी देश सोडून कुठेच जाणार नाही
मुलाखती दरम्यान त्या म्हणाल्या, मी इमारतीमधील माझ्या खोलीत बसले आहे. आणि तालिबानी येण्याची वाट पाहत आहे. इथे मला आणि माझ्या परिवाराला मदत करणारे कोणीही नाहीत. माझ्या पतीसह परिवारासोबतच मी इथेच थांबले आहे.
तालिबान्यांनी यावे आणि माझ्यासह अन्य लोकांची हत्या करावी. मात्र, मी देश सोडून कुठेच जाणार नाही. आणि जरी गेले तरी जाणार कुठे? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
अफगाणिस्तानमधील संघर्ष आता मानवी जीवनाच्या मूळावर उठला आहे. मृत्यूचे भय आणि सैतानांच्या तावडीतून सुटण्याचे हरप्रकारे प्रयत्न याचे भयावह दृश्य पाहयला मिळत आहेत.
तालिबानने अफगाणिस्तानातील बहुतांश शहरांवर कब्जा केला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घणी देश सोडून पळून गेले आहेत. ते उझबेकिस्तानला गेले असल्याचे समजते.