मुंबई : अजय गोरड : राज्यातील 17 जिल्ह्यांतील कोरोना रुग्णसंख्या 12 ऑगस्ट रोजी एक अंकी आढळून आली. राज्यातील 50 टक्के जिल्ह्यांत केवळ 68 इतकी कमी रुग्णसंख्या आणण्यात महाराष्ट्राला यश आले आहे. गेल्या 20-25 दिवसांत पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील रुग्णसंख्याही कमी झाली आहे. विदर्भातील भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. उर्वरित 10 जिल्हे कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. तर मराठवाड्याभोवतीचा संसर्गाचा विळखा सैल झाला आहे.
महाराष्ट्र कोरोना अपडेट :
कोरोनाने महाराष्ट्रात सर्वाधिक कहर माजवला असला तरी विदर्भाने कोरोनाला जवळपास हद्दपार केले आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, जळगाव, धुळे तर मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड या सहा जिल्ह्यांनी सुद्धा कोरोनाला रोखण्यात यश मिळवले आहे.
विदर्भातील सर्व 10 जिल्ह्यांतील रुग्णसंख्या एक आकडी झाली आहे. चार महिन्यांपूर्वी नागपूर, अमरावती, अकोला, नांदेड आदी जिल्हे राज्यातील सर्वात मोठे हॉटस्पॉट म्हणून पुढे आले होते. राज्यात दुसरी लाट 10 फेब्रुवारीनंतर सुरू झाली. एप्रिलच्या तिसर्या आठवड्यात दुसरी लाट शिखरावर होती.
दुसर्या लाटेत सर्वाधिक 68 हजार 631 रुग्ण 18 एप्रिल 2021 रोजी आढळले होते. तर, 22 एप्रिल 2021 रोजी सर्वाधिक 6 लाख 99 हजार सक्रिय रुग्ण होते. 25 मे नंतर राज्यातील रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने दुसरी लाट ओसरत असल्याचे मानले गेले. रुग्णसंख्या आटोक्यात येताच राज्य सरकारने जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत काही निर्बंध शिथिल केले.
पश्चिम महाराष्ट्र व कोकणात दुसरी लाट उशिराने सुरू
गेल्या दोन महिन्यापासून राज्यातील रुग्णसंख्या 5 ते 10 च्या हजाराच्या आसपास राहिली आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्यांत दुसरी लाट उशिरा सुरू झाल्याने तेथील 10 जिल्ह्यांतील रुग्णसंख्या 60 ते 70 टक्केच्या घरात होती.
गेल्या 20- 25 दिवसांत पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील रुग्णसंख्याही कमी झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत राज्यात दररोज सरासरी 5 ते 6 हजार रुग्णसंख्या आढळत आहे.
17 जिल्ह्यांत केवळ 68 रुग्ण
उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, जळगाव, धुळे तर मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, जालना आणि नांदेड हे सात जिल्हे आणि विदर्भातील सर्व 10 असे 17 जिल्ह्यांतून केवळ 68 रुग्ण आढळले आहे. त्यामुळे विदर्भासह मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांनी कोरोनाला रोखण्यात यश मिळवले आहे. विदर्भातील सर्व 10 जिल्ह्यांतील रुग्णसंख्या एक अंकी झाली आहे.
12 ऑगस्टला सर्वात कमी रुग्णसंख्येचे जिल्हे
उत्तर महाराष्ट्र ः नंदूरबार 0, जळगाव 3, धुळे 6, मराठवाडा ः हिंगोली 2, परभणी 2, नांदेड 6, जालना 10. विदर्भ ः यवतमाळ 0, वाशिम 1, भंडारा 1, गोंदिया 1, गडचिरोली 2, अमरावती 5, अकोला 6, चंद्रपूर 8, नागपूर 8, बुलडाणा 9.