मुबंई : महिला वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी यांच्यावरील गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द ठरविला आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरिसाल वन परिश्रेत्रात चव्हाण यांनी गोळी झाडून आत्महत्या केली होती.
त्यानंतर उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी केलेल्या छळाची चार पानी चिठ्ठी पोलिसांना सापडली होती. मेळघाटमध्ये २५ मार्च रोजी वनरक्षक दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती.आत्महत्येपूर्वी दीपाली चव्हाण यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये मानसिक छळाचा उल्लेख करण्यात आला होता. शिवकुमार करत असलेल्या छळाची तक्रार रेड्डी यांच्याकडे केली होती.
तरीही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या चिठ्ठीत रेड्डी यांचे नाव होते. त्यामुळे दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर श्रीनिवास रेड्डी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा न्यायालयाने रद्द ठरवला आहे. तसेच, सुनावणी सुरू असलेलं हे प्रकरण देखील बंद केले आहे. श्रीनिवास रेड्डी यांच्याविरोधात धारणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका रेड्डी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर केली होती. या याचिकेच्या सुनावणी होऊन गुन्हा रद्द करण्यात आला.
चिठ्ठीत रेड्डी यांचे नाव
दीपाली चव्हाण या हरिसाल व्याघ्र प्रकल्पाच्या सीपना वन्यजीव विभागात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या दीपाली यांनी अनेक मोहिमा यशस्वी राबविल्या होत्या.
त्यांनी अनेक गावांचे पुनर्वसन केले होते. डिंक तस्करांचा मध्य प्रदेशापर्यंत दुचाकीवरून पाठलाग करत तस्करांना सळो की पळो करून सोडले होते.
मात्र, त्याचवेळी शिवकुमार याने दीपाली यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली होती.
त्यातून त्यांनी २५ मार्च रोजी आपल्या सरकारी निवासस्थानी त्यांनी रिव्हॉल्वहरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती.
दीपाली यांनी आत्महत्येपूर्वी त्यांनी चार पानांची चिठ्ठी लिहिली होती. यामध्ये त्यांनी शिवकुमारसह रेड्डी यांच्या नावाचाही उल्लेख केला होता.
मेळघाटसारख्या दुर्गम भागात सेवा बजावत असताना त्यांना प्रचंड त्रास दिला होता. त्या गर्भवती असतानाही त्यांना ट्रेकवर नेले. त्यांना त्रास होत असतानाही सुट्टी दिली नाही. तसेच त्यांचे वेतन रोखून धरले होते, असे दीपाली यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले हाेते.