यवतमाळ : गेल्या वेळी विविध प्रकारचे आरोप करून विरोधकांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पुन्हा नवीन षडयंत्र रचल्या जात आहे. माझा राजकिय प्रवास संपविण्याचा डाव आहे. परंतु मी घाबरणारा नाही तर लढणारा आहे, असा निर्धार आमदार संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. घाटंजी येथील महिलेने शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आमदार संजय राठोड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
“मी एका संस्थेचा पदाधिकारी होतो. त्या संस्थेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत तीन कर्मचाऱ्यांवर सातत्याने गैरहजर असल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. जे बडतर्फ झाले त्या कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या. संस्थेच्या बाजूने निकाल लागला असून प्रकरण हायकोर्टात प्रलंबित आहे. मग अशावेळी मुलांचं भवितव्य लक्षात घेऊन संस्थेने शासनाकडे परवानगी मागितली आणि दोन शिक्षकं, स्वयंपाकी यांना घेतलं. या जागा भरल्यानंतर तात्पुरती नियुक्ती मिळाली.
यावेळी एका शिक्षकाचं प्रकरण समोर आलं. तात्पुरती नियुक्ती असल्याने त्या शिक्षकाने २०१७ मध्ये स्वत:हून राजीनामा दिला. मधल्या काळात शिक्षक आणि नातेवाईक पुन्हा आले आणि घेण्याची विनंती केली. यादरम्यान मी संस्थेचा राजीनामा दिला. त्यानंतर माझे सहकारी म्हणून काम करणाऱ्या शिक्षकाला माझा क्रमांक समजून मेसेज आले. त्यांचंही नाव संजयच आहे. यानंतर त्या शिक्षकाने २४ मे २०२१ रोजी तक्रार केली,” अशी माहिती संजय राठोड यांनी दिली आहे.
नंतर त्या प्रकरणाचा आधार घेऊन माझ्यावर आरोप करण्यात आले असा दावा करताना मीदेखील वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली असल्याची माहिती त्यांनी दिली. नैराश्याच्या मानसिकतेतून तक्रार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. राजकीय विरोधक राजकारणात वेगवेगळ्या पद्धतीचे फंडे वापरत असतात. मागील वेळी झालेल्या आरोपांचा आधार घेऊन आरोप होत आहेत असंही यावेळी ते म्हणाले.