अकोला(प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे नागरिकांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार भारसाकळे यांनी बोलावलेल्या बैठकीत नियोजन भवनामध्ये गोंधळ घातला. यामध्ये आमदारांचे कार्यकर्ते आणि मतदार यांच्यात चांगलाच वाद रंगला. अकोट मतदारसंघातील तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांबाबत ही बैठक बोलावण्यात आली होती.
बैठकीला आमदार, जिल्हाधिकारी उपस्थित
या बैठकीत अकोट मतदारसंघाचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, भाजप महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी निमा अरोरा आदी नेते उपस्थित होते. या नेत्यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा धारण केल्यामुळे या गोंधळाची एकच चर्चा रंगली आहे.
रस्त्याच्या प्रश्नामुळे मतदार आक्रमक
आोयजित करण्यात आलेल्या बैठकीत अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांबाबत चर्चा करण्यात येत होती. यावेळी चर्चेदरम्यान काही नागरिक अचानकपणे आक्रमक झाले. नागरिकांनी बैठक सुरु असतानाच गोंधळ घालणे सुरु केले. तसेच अकोल्यामध्ये बैठक घेणे म्हणजे नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न आहे. पाच-सहा वर्षाच्या कालावधीत काय दिवे लावले ? हे आमदारांनी सांगावे, असा खडा सवाल नागरिकांनी केला.
यापूर्वीही आमदार भारसाकळे यांना विरोध
दोन दिवसांपूर्वीही तेल्हारा येथे रस्त्याच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला आल्यानंतर आमदार भारसाकळे यांना विरोध झाला होता.
रस्त्यांची कामे प्रलंबित ठेवणाऱ्या संबंधित अभियंत्यांसह कंत्राटदारावर ठपका ठेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता नवघरे यांना या बैठकीत देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती घेण्यात येणार असून, त्यानंतर कार्यवाहीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी बैठकीत सांगितले.