अकोला- समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, स्वरुप चॅरिटेबल फाऊंडेशन व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र औरगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील कर्णबधीर मुले व श्रवणदोष असणारे जेष्ठ नागरिक यांना श्रवणयंत्रांचे मोफत वितरण करण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील ३०० लाभार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यासंदर्भात जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद अकोला, स्वरुप चॅरीटेबल फाऊंडेशन, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने एका सर्वेक्षणाद्वारे कर्णबधीर मुले व श्रवणदोष असणारे जेष्ठ नागरिकांचे जिल्हा व तालुकास्तरावर शोध घेवून त्यांच्या आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. तसेच अन्य आवश्यक उपचार पद्धती राबवून त्यांना डिजीटल श्रवणयंत्राचे मोफत वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून जिल्ह्यातील ३०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. लाभार्थ्यांना वेळा निश्चित करुन बोलावण्यात येऊन तपासणी व वितरण केले जात आहे. हे मोफत वितरण जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आजपासून सुरु झाले. हे वितरण सकाळी ११ ते दुपारी चार यावेळेत करण्यात येत आहे. शनिवार दि.७ पर्यंत सुरु राहणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाकरीता महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनवर्सन केंद्र औरगाबादचे संचालक विजय कान्हेकर व स्वरुप चॅरिटेबल फाऊंडेशनचे तज्ञ डॉ. सुरेश जे. पिल्लाई, डॉ.पी.व्ही सरथ, डॉ. सुरजीत पाईन, डॉ. देविदास कान्हेकर, डॉ. रवि शर्मा यांची उपस्थिती होती. यावेळी कर्ण तपासणी, श्रवण चाचणी इ. चाचण्याही करण्यात आल्या.