अकोला– जिल्ह्यात दि. 21 ते 23 रोजी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते व पुलाचे नुकसान झाले. तसेच काही गावांचे रस्ते नादुरुस्त असल्यामुळे संपर्क तुटला होता. या नादुरुस्त रस्ते व पुलाचे तातडीने दुरुस्ती करुन पुन्हा संपर्क प्रस्तावित करण्याकरीता 1 कोटी 3 लक्ष 46 हजार रुपयांचे निधीस राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या आदेशाने मान्यता देण्यात आले आहे.
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिनस्त असलेले खांबोरा ता. बार्शीटाकळी येथील पुलाची दुरुस्तीकरीता 9 लक्ष 90 हजार, नागद-सागद-हाता-कारंजा दुरुस्तीकरीता 2 लक्ष 80 हजार, पाळोदी- खांबोरा ता. अकोला करीता 4 लक्ष 80 हजार, हिरपूर-सोनाळा-रस्ता ता.मुर्तिजापूर करिता 9 लक्ष 98 हजार असे एकूण 27 लक्ष 48 हजार रुपये निधीस मान्यता दिली. तर कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद, अकोला यांच्या अधिनस्त असलेले गोत्रा-पाळोदी-आगर रस्ता ता. अकोला 5 लक्ष, रुइखेड ता.अकोट येथील रस्ता व पुल, मोरी दुरुस्तीकरीता 32 लक्ष 98 हजार, बदलापुर ता.बाळापूर येथील रस्ता व पुल दुरुस्तीकरीता 25 लक्ष, रेपाडखेड ता.मुर्तिजापूर येथील रस्ता व पुल, मोरी दुरुस्तीकरीता 5 लक्ष, शेरवाडी ता.मुर्तिजापूर जोडरस्ता व मोरी दुरुस्तीकरीता 8 लक्ष असे एकूण 75 लक्ष 98 हजार रुपयांच्या कामास मंजुरी देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी दिली.