शेगाव: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे दीर्घ आजाराने आज बुधवारी (ता. 4 ऑगस्ट) निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. गेले काही दिवसांपासून त्यांची प्रकृती “मल्टीऑर्गन फेल्युअर “मुळे चिंताजनक होती.
गेले दोन दिवसांत ती अधिक गंभीर झाली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र, आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नियोजनबद्ध कार्यपद्धती व शिस्तप्रियतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवशंकरभाऊंच्या नेतृत्वात श्रीगजानन महाराज संस्थानचा नावलौकिक संपूर्ण देशभर पसरला आहे. त्यांचे हे कार्य देशभरातील सर्व संस्थांना व्यवस्थापनशास्त्रातील मार्गदर्शक ठरणारी आहे.
राजकीय व्यक्तींमध्ये वरिष्ठांपर्यंत त्यांचे संबंध होते. शेगाव नगरपालिकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. शहराच्या विकासाकरिता राज्य शासनाने विकास आराखडा मंजूर केला विकास आराखड्यात शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी भाऊंचे मार्गदर्शन हे विकासाकरिता मैलाचा दगड ठरले आहे.
मुख्यमंत्र्यांनी केला शोक व्यक्त
मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, श्री. संत गजानन महाराज यांच्या ज्ञान, भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी शिकवणीवर नितांत श्रद्धा ठेवून शिवशंकरभाऊ जगले. त्यांनी आपल्या कर्मयोगातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही संस्थांची बांधणी केली. त्याद्वारे गोरगरिब आणि वंचिताची सेवाही केली. त्यांच्या निस्वार्थतेचे दाखले हे दंतकथा वाटतील अशा पण सत्य आहेत.
श्री. गजानन महाराज संस्थानाची कारभाराचे नियोजन, व्यवस्थापन हा जगभरातील तज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय राहीला आहे. त्यांच्या निधनाने सेवा कार्यासाठी आयुष्य वेचलेला कर्मयोगी काळाने हिरावून नेला आहे.