नॉटिंघम, 4 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला आजपासून सुरुवात होणार आहे. नॉटिंघमच्या ट्रेन्ट ब्रीज मैदानात पहिली टेस्ट खेळवली जाणार आहे. भारताने यावर्षी घरच्या मैदानात इंग्लंडचा 3-1 ने पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी इंग्लंडची टीम मैदानात उतरेल. इंग्लंडमधलं वातावरण नेहमीच फास्ट बॉलरना मदत करणारं राहिलं आहे. दोन दिवसांपूर्वी बीसीसीआयने पहिल्या टेस्टसाठीच्या पिचचा एक फोटो शेयर केला, यामध्ये पिचवर भरपूर गवत असल्याचं दिसत आहे, यामुळे फास्ट बॉलरना मदत होणार हे निश्चित आहे.
नॉटिंघमच्या खेळपट्टीवर गवत दिसत असलं तरी मॅचच्या दिवशी यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. इंग्लंडमध्ये खेळपट्टी तुटू नये म्हणून जास्त गवत वापरलं जातं आणि मॅच सुरू व्हायच्या आधी जास्तचं गवत कापलं जातं. भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या (WTC Final) मॅचमध्येही असंच झालं होतं. मॅचच्या तीन दिवस आधी साऊथम्पटनच्या पिचवरही नॉटिंघमप्रमाणेच गवत होतं, पण मॅचआधी हे गवत कापण्यात आलं होतं.
पिचवरून गवत काढलं तरी नॉटिंघममध्ये बॅटिंग सोपी असणार नाही. या मैदानातलं जुनं रेकॉर्डही हेच दर्शवतं. नॉटिंघममधल्या खेळपट्टीवर फास्ट बॉलर कायमच बॅट्समनसाठी डोकेदुखी ठरले आहेत, त्यामुळे जेम्स अंडरसन (James Anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) यांच्यापासून टीम इंडियाला सावध राहावं लागणार आहे.
अंडरसन-ब्रॉड यशस्वी
जेम्स अंडरसनने या मैदानात 10 टेस्टमध्ये 19.62 च्या सरासरीने 64 विकेट घेतल्या, यात 7 वेळा 5 विकेट आणि 2 वेळा 10 विकेटचा समावेश आहे. तर ब्रॉडने या मैदानात 6 टेस्टमध्ये 20.21 च्या सरासरीने 41 विकेट मिळवल्या. भारताकडून इशांत शर्माने या मैदानात 3 टेस्ट खेळून 12 विकेट घेतल्या आहेत.
टॉसची भूमिका महत्त्वाची
नॉटिंघममध्ये टॉसची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरते. या मैदानात झालेल्या 63 मॅचपैकी 23 मॅच म्हणजेच 36 टक्के मॅच पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमने जिंकल्या. तर 17 मॅच दुसऱ्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खिशात गेल्या. पहिल्या इनिंगचा सरासरी स्कोअर 321 रन, दुसऱ्या इनिंगचा 306 रन, तिसऱ्या इनिंगचा 263 रन आणि चौथ्या इनिंगचा 160 रन आहे. या मैदानात टेस्टचा सर्वाधिक स्कोअर 658 रन तर सगळ्यात लहान स्कोअर 60 रन आहे.
भारतासाठी दिलासादायक बाब म्हणजे या मैदानात त्यांचा मागच्या दोन्ही वेळा पराभव झाला नाही. 2018 साली टीम इंडियाचा 203 रनने विजय झाला, तर 2014 सालची टेस्ट ड्रॉ झाली होती.
पहिल्या दिवशी पावसाचा अंदाज
भारत-इंग्लंड यांच्यातल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाचा अंदाज 50 टक्के वर्तवण्यात आला आहे, पण यामुळे खेळ फार प्रभावित होणार नाही. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला उन्ह असणार आहे आणि तापमान 22 डिग्री असेल. तर हवेचा वेग 15 किमी प्रति तास असेल, त्यामुळे स्विंग बॉलर्सना मदत मिळेल. पहिले काही तास पिचमधून फास्ट बॉलर्सचा फायदा होईल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी बॅट्समनना रन काढणं सोपं जाईल.