अकोला– मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत जिल्ह्यातील 200 प्रशिक्षणार्थ्यांना मेडिकल ड्रेसर्स व मेडिकल रेकार्ड असिटंट अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी प्रशिक्षणाचे लाभ घेण्याचे आवाहन करुन प्रशिक्षणार्थ्यांना इन्डक्शन कीटचे वितरण जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत प्रशिक्षणार्थ्यांना 40 इन्डक्शन कीटचे वितरण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, उपअधिष्ठाता डॉ. कुसूमाकर घोरपडे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ. श्याम सिरसाम, डॉ. दिनेश नैताम, डॉ. अंनत धनवटे आदि उपस्थित होते.
आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोविड-19 व संसर्गजन्य रोगासंबंधित उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याकरीता जिल्ह्यात मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणांतर्गत आतापर्यत 200 प्रशिक्षणार्थ्यांनी मेडिकल ड्रेसर्स व मेडिकल रेकार्ड असिटंटचे मोफत प्रशिक्षण पुर्ण केले आहे. या प्रशिक्षणामुळे प्रशिक्षणार्थ्यांना खाजगी रुग्णालयात नोकरी मिळण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील बेरोजगार विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी केले.