अकोला (प्रतिनिधी)- १२७ वर्ष ओलांडून १२८व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या महानगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष एड. मोतीसिंह मोहता यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या बैठकीत मंडळाचे महासचिव सिद्धार्थ शर्मा कार्याध्यक्ष हरीश आलिमचंदानी, महासचिव विजय तिवारी, उपाध्यक्ष मनोज खंडेलवाल, मनोहर पंजवानी, एड. सुभाषसिह ठाकूर, सचिव संतोष पांडे,निरज शाह,सहसचिव मनोज साहू, मनीष हिवराळे, जयंत सरदेशपांडे आदी उपस्थित होते.या महत्वपूर्ण बैठकीत कोरोना संकटात सर्वत्र अनलॉक होत असून शासनाने अनेक निबंध शिथिल करून सर्वांना पूर्ववत परवानगी देणे सुरू केले आहे.याच धर्तीवर दिनांक १० सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या गणेशशोत्सव पर्वाला पण कोरोनाचे निबंध शिथिल करून हे पर्व उत्साहात साजरा करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या या बैठकीत करण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना पूर्वीसारखेच गतवैभव गणेश मंडळाला प्राप्त करून देण्यासाठी घरगुती गणपतीची मर्यादा दोन फूट ऐवजी तीन फूट व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीची उंची चार फूट ऐवजी सहा फूट करण्यात यावी.तसेच महानगरातील अकोला क्रिक्रेट क्लब परिसरात होत असणारी गणेशमूर्तीची विक्री महानगरातील इतर परिसरातही सुरू करण्यात प्रशासनाने परवानगी दयावी यामध्ये खुलेनाट्यगृहाचा परिसर, मुंगीलाल बाजोरीया विद्यालया मागील मैदान,गणेश घाट,सिंधी कॅम्प परिसरातील निरंकारी धर्मशाळा परिसर,डाबकी रोड मार्गावरील डॉ. आंबेडकर मैदान आदी भागात गणेश मुत्यांची विक्री करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या महत्त्वपूर्ण बैठकीत कोरोनामुळे आर्थिक संकटात असणाऱ्या मंडप ,लाईट,सजावट करणाऱ्या वर्गाला गणेशोत्सवात प्रोत्साहन म्हणून मनपा प्रशासनाने कोणताही कर आकारू नये असेही आवाहन करण्यात आले. महानगरातील प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने आपापल्या परिसरात पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी किमान पंचवीस झाडे लावून त्याचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहनही करण्यात येणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. शहरातील सर्व गणेश मंडळांनी कोरोना संकटाचे शिथिलीकरण बघता नव्या जोमाने कोरोना नियमांचे पालन करीत उत्साहात हे पर्व साजरे करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. महानगरातील सर्व गणेश मंडळांना सोबत घेऊन लवकरच यासंदर्भात एक बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली