अकोला(प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्य़ातील श्री गजानन महाराजांच्या मुळ चरण पादुका व काही काळ वास्तव्याने पुनित झालेल्या श्री गजानन पादुका संस्थान मूंडगाव ता. अकोट द्वारे ६५ गावात वृक्षारोपण महाअभियानाला सुरवात करण्यात आली.
मिशन ऑक्सीजन या उपक्रम अंतर्गत मुंडगाव येथील गजानन महाराज पादुका संस्थानच्या विश्वस्त मंडळाने पुढाकार घेवुन वृक्षारोपण व त्यांची जोपासना करण्याचा संकल्प केला आहे.जगतगुरू तुकोबाराय सोळाव्या शतकातच वृक्ष, पर्यावरणाचे महत्त्व सांगून गेले. सध्या आपल्या देशावर कोरोना संकटाने थैमान घातले आहे. कित्येक रुग्णांना प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन आभावी आपले प्राण गमवावे लागले. हॉस्पिटल मधे मोठ्या प्रमाणात प्राण वायूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.
याआधी मानवाने आपल्या गरजा भागवण्यासाठी लाखो वृक्षांची अमानुषपणे कत्तल केली आहे. आज लाखो रुपये खर्च करून प्राण वायू मिळत नाही. वृक्ष ही नैसर्गिक ऑक्सीजन बनवणारे एकमेव स्त्रोत आहे. प्राणवायू देणाऱ्या झाडांची संख्या वाढवण्याची व संगोपन करण्याची नितांत आवश्यकता आहे.म्हणूनच पादुका संस्थानने स्वतःची स्वतंत्र रोप वाटीका तयार केली आहे. या वाटीकेत पिंपळ, कडू लिंब, चिंच यासारख्या ऑक्सिजन देणाऱ्या सर्व देशी वृक्ष रोपांचा समावेश आहे. व सामाजिक वनीकरण परीक्षेत्र अकोट यांनी या अभियाना करीता रोपे दिली आहे.
मूंडगावसह संस्थानचे २००० पुरुष व महिला सेवाधारी असलेल्या ६५ गावात भक्तांच्या, मदतीने २५ जुलै रोजी त्यांच्या गावात श्री गजानन महाराजांचे पट्टशिष्य श्री झामसिंग राजपूत यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रीय किर्तनकार श्री सत्यपाल महाराज चिंचोळकर व गट विकास अधिकारी पंचायत समिती अकोट यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या सप्ताहात या सर्व गावांत स्थानिक ग्राम पंचायत, युवा मंडळ, श्री गजानन महाराज यांच्या मदतीने हे सेवाधारी दहा हजार रोपांचे वृक्षारोपण करणार आहे. तसेच श्रींच्या भक्तांना श्री चा प्रसाद म्हणून एक प्रासादिक रोप देण्याचा मानस विश्वस्त मंडळाचा आहे.
याआधी कोरोना काळात पादुका संस्थान द्वारे गरजूंना अन्नदान, निर्जंतुकीकरन, कोरोना जनजागृती, आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव च्या विश्वस्त मंडळाच्या “मिशन ऑक्सिजन” च्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होवून सहकार्य लाभत आहे