रायगड : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातही पावसाने हाहाःकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून (Raigad Landslide) तब्बल 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात (Taliye Village) ही भीषण दुर्घटना घडली. तुफान पावसामुळे 35 घरांवर दरड कोसळली असून 80 ते 85 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. या भीषण दुर्घटनेनंतर NDRF कडून बचावकार्य सुरु आहे.
दरम्यान, इतके तास होऊनही राज्य सरकारला या दुर्घटनेचा थांगपत्ताही नाही. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे भाजपच्या काही आमदारांसह तळीये गावात दाखल झाले आहेत. विरोधी पक्षनेता धडपडत गावात येतो, सरकार कुठंय? इथे तलाठीही नाही, असा सतांप तळीये गावातून प्रवीण दरेकरांनी व्यक्त केला. प्रवीण दरेकर, भाजप आमदार गिरीश महाजन हे या गावात आहेत.
प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 80 लोक दबले गेल्याची माहिती ग्रामस्थांनी केली आहे. आतापर्यंत 36 जणांचे मृतदेह हाती लागले आहे. मात्र इतकं निर्लज्ज सरकार, प्रशासन आहे की त्यांना या घटनेची माहितीच नाही. काल दुपारी 4 वाजता ही घटना घडली तरी अजून मदत मिळू शकलेली नाही.
नेमकं काय घडलं?
गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून 36 जणांचे मृतदेह बाजूला काढले. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.
दरम्यान, एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिक करत आहेत.
शासनाची अशी निगरगट्टी यंत्रणा आयुष्यात पाहिली नाही- प्रवीण दरेकर
एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासन संवेदनशील नाही. सरकार भावनाशून्य झालंय. शासनाच्या ही अशी निगरगट्ट यंत्रणा मी माझ्या आयुष्यात पाहिलेली नाही, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आपला संताप व्यक्त केला. माझी शासनाकडे विनंती आहे की या घटनेकडे गांभीर्याने बघून त्वरित मदत कार्य सुरू करा, अशी मागणी दरेकर यांनी केली.
ही घटना मोठी आणि दुर्दैवी असल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधून हेलिकॉप्टर मागवावे, असंही प्रवीण दरेकर म्हणाले.
रायगडमधल्या पूरस्थितीचा मुख्यमंमंत्र्यांडून आढावा
महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे, मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टर मधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली.