अकोला- गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात व तालुक्यात पुरपरिस्थिती निर्माण होवून मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे 13 पथकाव्दारे पंचनामा करुन तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले.
रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार, निलेश अपार, विश्वनाथ घुगे, तहसिलदार अरकराव तसेच महसुल विभाग व महानगरपालिकाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गेल्या 24 तासामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अकोट तालुक्यातील पनोरी येथील 45 वर्षीय व्यक्ती पठार नदीच्या पुरामध्ये वाहुन गेले असुन त्यांचे शोध कार्य सुरु आहे. तसेच जिल्ह्यात 2237 घरांचे नुकसान झाले असून 6200 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. तर 153 जनावरांचे मृत्यू झाले असल्याची माहिती आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे.
अकोला शहरातील मोर्णा नदीच्या पुरामुळे अडकलेल्या 40 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. तर उगवा गावाच्या शेतात पुरामुळे अडकलेल्या दोन लोकांना एसडीआरएफ पथकाने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तसेच तालुक्यातील पुरामुळे अडकलेल्या 26 लोकांना स्थानिक शोध व बचाव पथकाने सुरक्षित बचावकार्य केले. अतिवृष्टीचा पंचनामा करण्याकरीता तलाठी, ग्रामसेवक व मनपा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथकाव्दारे सर्वेक्षण करण्यात येणार असून अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा तात्काळ सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिलेत. तसेच सुरक्षेच्या अनुषंगाने नागपूर येथील एसडीआरएफ पथक व स्थानिक आपत्ती पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.