अकोला : सन २०१९ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात वऱ्हाडातील अकोला जिल्ह्याला पहिल्यांदाच राज्यमंत्रिपदाचा मान संजय धोत्रे यांच्या रुपाने मिळाला होता. सतत चार वेळा खासदार म्हणून निवडून आलेले धोत्रे शिक्षण, दूरसंचार व तंत्रज्ञान राज्यमंत्री बनले. पण अवघ्या २६ महिन्यांतच त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यासाठी त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे करण्यात आले.
अकोला लोकसभा मतदारसंघातून सलग चारवेळा खासदार म्हणून निवडून आलेले संजय धोत्रे यांना नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपद मिळाले होते. अकोला जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक सोहळा होता. शिक्षण, दूरसंचार व तंत्रज्ञान राज्यमंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी २६ महिने सांभाळली. दरम्यानच्या काळात त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत गेल्यात. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर झाला. नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसोबतच काही तरुण चेहरे मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले. त्यात संजय धोत्रे यांना जागा रिकामी करावी लागली. मंत्रिमंडळाच्या विस्तार सोहळ्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
ब्रिक्स परिषद ठरली शेवटची
आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणाच्या बाबतीत मंथन घडवून आणण्यासाठी ब्रिक्स परिषदेचे आयोजन भारताच्या नेतृत्वात करण्यात आले होते. या परिषदेचे अध्यक्षपद शिक्षणमंत्री म्हणून संजय धोत्रे यांना मिळाले होते. ही त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील शेवटची परिषद ठरली.
‘हे’ ठरले कारणीभूत!
केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाल्यानंतर संजय धोत्रे यांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत गेल्या. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही त्यांची तब्येत बिघडली होती. आरोग्याच्या तक्रारी वाढत असल्याने व राज्यमंत्री म्हणून काम करताना व्याप बघता त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या मंत्रालयाकडून कोणताही मोठा प्रकल्प राबविला गेला नाही, ज्याने जनसामान्यांवर प्रभाव टाकला जाऊ शकेल. हेही एक कारण त्यांच्या राजीनाम्यामागील असल्याचे बोलल्या जात आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातही त्यांना विशेष कामगिरी करता आली नाही. भाजपने मंत्रिमंडळात मराठा नेते म्हणून संजय धोत्रे यांना संधी दिली होती.