मुंबई : राज्य सरकार ३१ जुलै २०२१पर्यंत ‘एमपीएससी’च्या सर्व रिक्त जागा भरणारा आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.
विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) लेखी परीक्षा उत्तीर्ण होवूनही दोन वर्ष पदे न भरल्याने विद्यार्थी स्वप्निल लोणकर याने काल आत्महत्या केली. या घटनेचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले.
यावेळी अजित पवार म्हणाले, ‘एमपीएससी’ विद्यार्थी स्वप्निल लोणकर याच्या आत्महत्येची घटना वेदनादायी आहे. लोणकर कुटुंबीयांच्या दु:खात सभागृहाचे सर्व सदस्य सहभागी आहेत. मागील १६ महिने कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे.यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेवरही याचा परिणाम झाला. काही दिवसांपूर्वी परीक्षा स्थगित करण्यात आल्याने राज्यातील विविध भागात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. मात्र कोरोना संकटामुळे परीक्षा घेणे धोकादायक होते, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) ही स्वायत्त संस्था आहे, याची सर्वांनाच कल्पना आहे. काल राज्य मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात कोणता निर्णय घेता येईल, याबाबत जयंत पाटील, एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मंत्र्यांबरोबर चर्चा केली आहे. ३१ जुलैपर्यंत सर्व रिक्त जागा भरल्या जातील, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.