मान्सूनचे वारे हिमालयातच रमले आहे. महाराष्ट्रात मात्र सध्या तरी पोषक स्थिती नाही. त्यामुळे 10 जुलैपर्यंत तरी मोठा पाऊस राज्यात पडणार नाही, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने रविवारी वर्तवला. जुलै महिन्यात देशभरात 96 ते 104 टक्के पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी 1 जुलै रोजी जाहीर केला. मात्र, महाराष्ट्रात तो सरासरीपेक्षा कमी पडणार असल्याचा अंदाज आल्याने राज्यात चिंतेचे वातावरण आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते, यंदा मे महिन्यात भरपूर पाऊस झाल्याने उन्हाचा तडाखा कमी जाणवला.
मे महिन्यात तापमान जेवढे जास्त तेवढा चांगला पाऊस जून-जुलैमध्ये अपेक्षित असतो. मात्र, त्यामुळे जूनमध्ये विदर्भ, उत्तर महाराष्ट्र वगळता बहुतांश भागात पावसाने सरासरी पार केली. मात्र, जुलैच्या सुरुवातीलाच पावसाने मात्र निराशा केली. 4 ते 8 जुलैपर्यंतचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला. यात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भाग वगळता संपूर्ण राज्यात कोरडे वातावरण राहणार आहे.