पुणे : मान्यता देण्यात आलेल्या महाविद्यालयांमधील 4 हजार 74 प्राध्यापकांच्या पदांपैकी 1 हजार 674 प्राध्यापकांच्या रिक्त जागांची भरती पूर्ण करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या काळात थांबलेली 3 हजार 64 प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती प्रक्रियाही लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्वासन रविवारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले. या निर्णयाचे स्वागत करत नेट-सेट पीएच.डी. पात्रताधारक संघर्ष समितीने आंदोलन मागे घेतले आहे.
सामंत म्हणाले, प्राध्यापक भरती प्रक्रियेची अर्थ मंत्रालयाकडून मान्यता घेतल्यानंतर भरतीसंदर्भात लवकरच शासन निर्णय काढणार आहे. 2020 या वर्षापर्यंत एकूण रिक्त पदे गृहीत धरून 700 पदांचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 2020 या वर्षापर्यंत प्राध्यापकांची किती पदे रिक्त आहेत, याबाबतच दोन महिन्यांत सर्व्हे करण्यात येणार आहे. तासिका तत्त्वावर काम करणार्या प्राध्यापकांच्या मागणीच्या अनुषंगाने 48 मिनिटांची तासिका देऊन मानधनात 25 टक्के वाढ करण्यात आली आहे. ग्रंथपाल भरतीसंदर्भात केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत 121 ग्रंथपाल भरती तसेच विद्यापीठांतील शिक्षकांची 659 पदांची भरती करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सीएचबी प्राध्यापकांवरील अन्याय दूर करण्यासाठी समिती
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांवर जो अन्याय होतो, तो अन्याय दूर करण्यासाठी उच्चशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. यामध्ये संघटनांचे प्रतिनिधी, दोन तज्ज्ञ आणि सहसंचालक या समितीचे समन्वयक राहणार आहेत.