पुणे : कोरोनाचा विषाणू सतत बदलतो. म्हणजे त्यावर जे काटे (स्पाईक प्रोटिन) असतात, त्यातील एक जरी काटा बदलला, तरी कोरोनाचा एक नवा उपप्रकार तयार होतो. लस घेतली तरी त्याच्या न्युट्रिलायजिंग अँटिबॉडी कमी होत जातात. त्यासाठी मास्क वापरण्याबरोबरच दर 11 ते 12 महिन्यांनी कोरोनाची लस पुन्हा घ्यावी लागेल, अशी माहिती राज्याच्या कोव्हिड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी दिली.
‘इन्फो डोस’ या फेसबुक पेजवरून ‘कोरोना आणि तिसरी लाट’ या विषयावर त्यांनी रविवारी जनतेशी लाईव्ह संवाद साधला. ते म्हणाले की, कोरोनाचा एखादा उपप्रकार समोर येतो, तेव्हा त्याचा संसर्ग आणि त्याची तीव्रता (विरूलन्स) कशी आहे, यावर तो किती उपद्रवी आहे, हे समजते. याप्रमाणे बदललेल्या ‘डेल्टा’ आणि ‘डेल्टा प्लस’ या विषाणूंची संसर्ग क्षमता जास्त आहे. त्याचा संसर्ग आणि तीव—ताही (विरूलन्स) वाढलेली आहे.
दुसरी लाट ओसरण्याआधीच तिसरी लाट सुरू होते का, असा प्रश्न पडला आहे. एका बाजूला विषाणू बदलतोय आणि दुसरीकडे लोक लस घेताना दिसून येत नाहीत. पहिल्या लाटेत कुटुंबातील 6 पैकी एकच जण बाधित व्हायचा. मात्र, दुसर्या लाटेत कुटुंबातील सर्व बाधित होताना दिसले. याचे कारण डेल्टा विषाणू आहे. त्यामुळे लसीकरण आणि मास्क, हे पर्याय आपल्या हातात आहेत. मास्क हीच एक उत्तम लस आहे, असे डॉ. ओक यांनी सांगितले. पोळी, भात, आमटी, सॅलड तसेच हंगामी फळे हाच आहार शरीराला प्रोटिन मिळण्यासाठी आणि प्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी उपयुक्त आहे. व्यायाम, मोकळ्या हवेत चालणे आदी गरजेचे आहे. त्यासाठी वरून वेगळी सप्लिमेंट घेण्याची गरज नाही, असेही डॉ. ओक यांनी स्पष्ट केले.
‘कोव्हॅक्सिन’ लस घेतल्यास परदेशात प्रवासही शक्य
पूर्वी ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पुरेसा डेटा नसल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने या लसीला मान्यता दिली नव्हती. आता या लसीच्या तिसर्या व चौथ्या डोसचा डेटा पुढे आला आहे. त्यामुळे तिलाही आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे. फक्त ज्या देशांत जाणार आहोत, त्या देशात या लसीबाबत काय निर्णय आहे, हे पाहून प्रवास करायला हवा, असे ते म्हणाले.