जयपूर: राजस्थान पोलिसांनी फेसबुकवर (Facebook) मैत्री करुन 2.5 कोटी रुपयांचा सायबर फ्रॉड (Cyber Fraud) करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी नीरज सूरीने फेसबुकवर एका महिलेशी मैत्री करुन तिला 3.9 मिलियन डॉलर संपत्तीची वारस बनवण्याच्या नावाने फसवणूक केली आहे. पोलिसांनी आरोपीला देहरादूनमधून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये सवाई माधोपूर येथे राहणाऱ्या गुंजन शर्मा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात यासंदर्भात अहवाल दाखल केला. त्यानंतर पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार, जयपूर सायबर क्राईम पोलिसांनी मोठ्या तपासानंतर प्रकरणाच्या मुळाशी जात आरोपीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला फेसबुकवर रेबेका क्रिस्टीन नावाने ओळख सांगितली आणि चर्चा सुरू केली. बोलताने त्याने स्वत:ला कॅन्सर पीडित महिला असल्याचं सांगितलं आणि पतीचा मृत्यू झाल्याचंही म्हटलं. आरोपीने सांगितलं, की त्याच्या कुटुंबात कोणीही नाही आणि त्याच्याकडे 3.9 मिलियन डॉलरची संपत्ती आहे. ही संपत्ती त्या महिलेच्या नावे करायचं आरोपीने सांगितलं. आरोपीने आपल्या बोलण्यातून, पीडित महिलेला आपल्या जाळ्यात अडकवलं.
रेबेका क्रिस्टीन अशी ओळख सांगितलेल्या आरोपीने त्याचा वकील आणि भारतीय प्रतिनिधी पुढील प्रक्रिया करण्यासाठी तिच्याशी संपर्क करतील असं पीडितेला सांगितलं. त्यानंतर पीडित महिलेला फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंटकडून लगेचच ईमेल आला. बॅन जॉनसन नावाने प्रतिनिधी असल्याचं म्हणत त्याने महिलेशी संपर्क केला आणि इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंडवर लागणारे चार्जेस, प्रोसेसिंग फीस आणि वकीलांच्या खर्चासहित इतर काही फॉर्मेलिटीजसाठी पैसे लागणार असल्याचं त्याने सांगितलं.
55 बँक खात्यात मागवले अडीच कोटी रुपये –
या सर्वांच्या नावाने महिलेकडून 2.5 कोटी रुपये वेगवेगळ्या 55 बँक खात्यात मागवले. प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी महिलेने जसे सांगितले तसे पैसे बँक खात्यात पाठवले. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीनंतर अनेक घोटाळे समोर आले. उच्च तंत्रज्ञानाचा वापर करत पोलिसांनी आरोपी नीरज सूरीची ओळख पटवली आणि त्याला अटक केली.
चौकशीत अनेक खुलासे –
आरोपीने एका बनावट सीए कार्ड बनवून दिल्ली, मसूरी आणि देहरादूनमध्ये ऑफिस ओपन करुन लोकांना लोन देणं, जीएसटी आयटीआर, पॅनकार्ड आणि आधार कार्ड बनवून त्याच कागदपत्रांनी बनावट बँक खाती ओपन करण्यासाठी कागदपत्र तयार करत होता. तसंच नायजेरियन लोकांसह मिळून त्यांना बँक खाती उपलब्ध करुन देऊन अधिक कमिशन कमावण्याचं काम होत होतं.