मुंबई : राज्यात शनिवारपासून (ता. 19) 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होत आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र सरकारने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला असून त्याप्रमाणे शनिवार पासून 30 ते 44 या वयोगटातील नागरिकांना शासकीय लसीकरण केंद्रात लस दिली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे. 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन अॅपमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत.