चंदीगड : फ्लाईंग शीख नावाने ओळखले जाणारे क्रीडा क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी रात्री उशिरा कोरोनामुळे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. पाच दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे कोरोनानंतरच्या गुंतागुंतीच्या आजारामुळे निधन झाले होते. मिल्खा सिंग यांच्यावर चंदीगड आयईएमआरमध्ये उपचार सुरू होते.
मिल्खा सिंग आणि त्यांच्या पत्नी निर्मल या 20 मे रोजी कोरोना संक्रमित झाले होते. 24 मे रोजी दोघांनाही एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. 30 मे रोजी कुटुंबीयांच्या आग्रहानंतर त्यांना घरी आणण्यात आले. घरीच त्यांच्यावर उपचार सुरू राहिले. मात्र, 3 जून रोजी पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
मिल्खा सिंग प्रख्यात धावपटू होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक विक्रम नोंदवले आणि पदके पटकावली. मेलबर्न येेथे 1956 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तर रोम येथील 1960 चे आणि टोकियोमधील 1964 च्या ऑलिम्पिकमध्ये आपल्या अत्युच्च कामगिरीने मिल्खा सिंग यांनी अनेक दशके भारतीयांच्या मनावर राज्य केले.
मिल्खा सिंग यांचा जन्म गोविंदपुरा (सध्याच्या पाकिस्तानातील ठिकाण) येथे 20 नोव्हेंबर 1929 रोजी झाला होता. फाळणीनंतर ते भारतात आले. नंतर ते सैन्य दलात भरती झाले. सैन्य दलात त्यांच्या कारकिर्दीला झळाळी मिळाली. क्रॉसकंट्री स्पर्धेतून त्यांनी क्रीडा क्षेत्रातील कारकीर्द गाजवली.