अकोला – व्यापारी व शेतकऱ्यांच्या कृषी मालाची साठवण सुरक्षित करता यावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, मुर्तिजापूर येथे सर्व सोईसुविधायुक्त गोडाऊन दुकानांचे लोकार्पण राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी कृषी बाजार समितीचे अध्यक्ष ॲड. सुहासराव तिडके, उपसभापती गणेशराव महल्ले, खरेदी विक्री समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध तिडके, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, तहसिलदार पवार, जिल्हा परिषद सदस्य संजीव नाईक, कृषी उत्पन्न समितीचे संचालक मंडळ व शेतकरी उपस्थित होते.
तत्पूर्वी पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वृक्षरोपण करण्यात आले. नवीन गोडाऊन निर्मितीमुळे शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना कृषी माल ठेवण्यास फायदा होणार आहे. कृषी बाजार समितीव्दारे शेतकऱ्यांकरीता केलेल्या कामाचे कौतुक ना. बच्चू कडू यांनी यावेळी केले. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळावा, दलाल किंवा अडत्याकडून शेतकऱ्यांचे शोषण होवू नये, तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषी बाजार समितीने प्रयत्न करावे. कृषी मालावर प्रक्रिया करुन आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्याकरीता प्रयत्न करावे. मुर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यातील उत्कृष्ठ खरेदी विक्री केंद्र व्हावे, या करीता नियोजन करुन प्रस्ताव सादर करण्याचे सूचना ना. बच्चू कडू यांनी यावेळी दिले.