राज्यातील काही जिल्ह्यांत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करताच रुग्णसंख्येत वाढ दिसत आहे. त्यामुळे आठ दिवस निरीक्षण केल्यानंतर रुग्णसंख्या वाढत राहिल्याचे समोर आल्यास त्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लागू करावे लागतील, असे संकेत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रविवारी दिले.
पुणे येथील व्हीव्हीआयपी विश्रामगृहात ओबीसी आरक्षण आणि पदोन्नतीसंदर्भात ओबीसी नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते. शनिवारची राज्यातील आकडेवारी पाहता रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणापेक्षा नवीन रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र, आजच यावर ठोस असे भाष्य करता येणार नाही. पुढचे आठ दिवस या परिस्थितीत काय बदल होतात, ते पाहावे लागेल. सध्या काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या हळूहळू वाढत असल्याचे दिसत आहे. आपण सवलती व काही प्रमाणात सूट दिल्यानंतरचा हा बदल आहे. अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली तर एकंदर स्थितीचा आढावा घेऊन अनेक निर्बंध नव्याने लावावे लागतील, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
बंग हे जागतिक पातळीवरचे कार्यकर्ते
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांनी एका लेखाद्वारे चंद्रपूरचे पालकमंत्री वडेट्टीवार यांच्यामुळेच दारूबंदी उठविण्यात आली, असा आरोप केला आहे. त्याला उत्तर देताना वडेट्टीवर यांनी, बंग हे जागतिक पातळीवरचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्र व्यसनमुक्त झाला असून, आता कोणी तंबाखूसुद्धा खात नाही, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.