अकोला : बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवरील मन नदीवर शंभर वर्षापूर्वीचा जुना पुल आहे. या पुलावरून आज (शुक्रवार) सकाळी एक वाहन कोंबड्या घेऊन जात होते. या दरम्यान पुलाचा एका बाजूचा भाग अचानकपणे कोसळला. यामुळे कोंबड्या नेणारे वाहन पुलावरच लटकल्याची धक्कादायक घटना घडली. हा पूल खचल्याने या मार्गावरील वाहतूक अकोला मार्गे वळविण्यात आली. सदरील पुलाच्या बाजूने नवीन पुलाचे बांधकाम सुरु आहे. कंत्राटदाराने जुना पूल कोरून ठेवल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
शेगाव –अकोट राज्यमार्गावरील लोहारा गावाजवळ असलेल्या मन नदीच्या पुलावर ब्रिटीशकालीन पूल आहे. मात्र याच ठिकाणी कवठा बॅरेज तयार करण्यात आले आहे. या नदीपात्रात पाणी जास्त थांबविले जाणार असल्याने जुन्या पुलाची उंची वाढविण्यासाठी बाजूनेच नवीन पूल तयार करण्यात येत आहे. मात्र नवीन पूल तयार करीत असतांना कंत्राटदाराने जुन्यापुलाजवळ खोदकाम केल्याने आज (शुक्रवार) सकाळी या पुलावरून एक वाहन कोंबड्या घेऊन जात असतांना पुलाचा एक भाग पूर्णपणे ढासळला. या सदरील वाहन पुलावरचं लटकले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर जेसीबीच्या साह्याने कोंबड्या भरलेली बोलेरो जीप बाहेर काढण्यात आली, मात्र सदरील पुलाचा एक भाग ढासळल्याने राज्यमार्गावरील वाहतून अकोला मार्गे वळविण्यात आली आहे.