अकाेला : वडिलांचे छत्र हरविलेले, आईला कॅन्सर, काेराेना संकटात मदतीच्या हातांना आलेल्या मर्यादा यामधून मार्ग काढत एका १२ वर्षांच्या चिमुकल्याने आईच्या उपचारासाठी अकाेल्यातील रस्त्यावर भीक मागून पैसे गाेळा करण्याचा मार्ग पत्करला. भीक मागून जी काही रक्कम जमा हाेईल त्यामधून आईच्या औषधांचा खर्च भरून काढण्याचा प्रयत्न हा चिमुकला करीत असल्याचे समाेर आले आहे. अकाेला तालुक्यातील दाळंबी या गावातील विक्की मांडाेकार असे या चिमुकल्याचे नाव आहे.
विक्की मांडाेकार याची आई शाेभा ही गेल्या वर्षभरापासून आजारी आहे. दिवाळीच्या दरम्यान तिला कॅन्सरने वेढले असल्याचे समाेर आले अन् या परिवारावर दु:खाचा डाेंगरच काेसळला. पतीचे निधन झालेले, पदरात तीन मुले, हातमजुरीवर घराचा उदरनिर्वाह अशा स्थितीत उपचाराचा खर्च झेपायचा तरी कसा, असा प्रश्न उभा ठाकला. शाेभा यांचा भाऊ मदतीला आला. त्याने अकाेल्यातील तुकाराम हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, तिच्यावर शासकीय याेजनेत उपचाराची साेय झाली, उपचाराअंती त्यांना केमाे थेरपी सांगण्यात आली, प्रत्येक केमाेसाठी अकाेल्यात येणे, औषधांचा खर्च याकरिता मांडाेकार परिवाराची ओढाताण सुरू झाली. गावातील सरपंचांनीही एका केमाेसाठी मदत केली.
काेराेना संकटाचीही भर पडली
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने उद्रेक सुरू केला, त्यामुळे या परिवाराच्या अडचणींत भर पडली, आठ व पाच वर्षांच्या दाेन्ही मुलांना भावाकडे साेपवून शाेभा यांनी अकाेल्यात हाॅस्पिटलच्या आश्रयाला राहणे पसंत केले. औषधांसाेबतच राेजच्या खाण्यापिण्याचा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्नच हाेता. विक्कीने तुकाराम हाॅस्पिटल ते नेहरू पार्क, काैलखेड, मलकापूर अशा परिसरात फिरून मदत मागण्यास सुरुवात केली. त्याला अनेकांनी झिडकारले मात्र काहींनी सहानुभूतिपूर्वक मदत केली.
व्हाॅटसॲप स्टेटसमुळे कळली माहिती
विक्की मदतीसाठी याचना करतानाचा एक फाेटाे व त्याच्या परिस्थितीचे वर्णन करून साहील गवई या युवकाने व्हाॅटस्ॲपच्या स्टेटसवर ठेवला हे स्टेटस पाहून युवा स्वाभिमानी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सागर खंडारे यांनी विक्कीची माहिती घेऊन थेट रुग्णालय गाठले. त्याच्याकडून सगळी परिस्थिती समजून घेत त्याला उपचारासाठी तसेच राेजच्या खाण्यापिण्यासाठी मदतीचा हात दिला. युवा स्वाभिमानी पार्टीचे महासचिव आकाश जवंजाळ यांच्यासह सुशील तेलगाेट या युवकांनीही सागर खंडारे यांच्या समवेत विक्कीला मदतीसाठी पुढाकार घेतला.
परिवारालाही दिला हात
विक्की व त्याची आई अकाेल्यात उपचारासाठी थांबलेले असल्याने त्याच्या दाेन भावंडांची परवड हाेऊ नये म्हणून सागर खंडारे व मित्रांनी त्याच्या परिवारालाही किराणा पाठवून मदत केली. या परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धारही त्यांनी बाेलून दाखविला.
उपचारासह मदतीचीही गरज
शाेभा यांच्यावर सुरू असलेल्या केमाे थेरपीमधील आता शेवटचा केमाे बाकी आहे. त्यानंतरचा औषधाेपचार, आहार यासाेबतच परिवाराचे रहाटगाडगे चालण्यासाठी मदतीचीही गरज आहे. अवघ्या सातव्या वर्गात शिकत असलेल्या विक्की या चुणचुणीत मुलावरच सर्व परिवाराचा भार येऊन पडला असल्याने दातृत्वाच्या हातांनी पुढाकार घेतल्यास या परिवाराला सावरण्यासाठी मदत हाेईल.