बीड : “एकच मिशन, मराठ्यांचं ओबीसी करण” असा नारा देत मराठवाडा मराठा आरक्षण (Maratha reservation) संघर्ष समितीने मराठा समाजाचा ओबीसीत (OBC) समावेश करावा अशी मागणी केली आहे. यासाठी मराठवाड्यात मराठा आरक्षण संघर्ष समितीने ठीकठिकाणी बैठका घेण्यास सुरुवात केली असून जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. ‘ओबीसी हा मराठा समाजाचा हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा निर्धार यावेळी समितीचे अध्यक्ष प्रदीप साळुंखे यांनी बोलून दाखवला. यामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये येत्या काळात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटणार असल्याचं चित्र दिसून येणार आहे.
ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण ठरवल्यामुळे ओबीसी समाज आक्रमक आहे. त्यातच मराठा समाजाने ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे अशी मागणी केल्यामुळे मराठा आमने-सामने येण्याचे चित्र दिसून येत आहे. हैदराबाद संस्थानातील मराठवाडा सामील झाला. त्यामुळे मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यात तेलंगणामध्ये मराठा समाजाला आजही कुणबी म्हणून ओबीसीमध्ये आरक्षण आहे. निजाम कालीन दस्तऐवज शोधण्यासाठी समिती नेमण्यात यावी व पुरावे द्यावेत, असे देखील मागणी प्रदीप सोळुंखे यांनी केली.
तोडफोड आणि रास्ता रोको करून किंवा मोर्चा काढल्याने न्यायालय दखल घेत नाही, त्यामुळे कायदेशीर लढाई करणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आलंय. मराठवाड्यातील मराठा हा ओबीसीचं असल्याचा दावा यावेळी सोळुंके यांनी केला आहे.
हैदराबाद संस्थानात असलेल्या कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील मराठा समाजास ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळाला, मात्र मराठवाड्यातील मराठा समाज ओबीसी आरक्षणापासून वंचित राहिला आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून शिक्षण आणि नोकरीतील अनुशेष भरून निघावा, यासाठी छावा मराठा संघटनाचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे. या याचिकेसाठी मराठवाड्यातून कायदेतज्ञ यांनी सहकार्य करावे, असं त्यांनी सांगितलं. तसंच आरक्षणामुळे मिळालेले मराठा समाजाचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत त्यामुळे इतर प्रश्नाकडे देखील राज्य सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणीही प्रदीप सोळुंखे यांनी केली.
मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसीत समावेश करा या मागणीमुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.