अकोला : जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या होमगार्डसवर सध्या बेरोजगारीचे संकट घोंगावत आहे. कोरोनाच्या संकटामुळे या होमगार्डला ड्यूटी मिळत नसल्याने त्यांच्या रोजगाराचा व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात ७६४ होमगार्ड नोंदणीकृत आहेत. या होमगार्डकडून अकोला पोलीस दलासोबत वाहतूक सुरळीत करण्यासह मोर्चा बंदोबस्त, धरणे आंदोलनात बंदोबस्त, ईद, गणेशोत्सव, दुर्गोत्सव, राजराजेश्वर कावड पालखी महोत्सव यासह विविध सण-उत्सवाला होमगार्ड कार्यरत असतात. मात्र दीड वर्षांपूर्वी देशावर कोरोना या भीषण आजाराचे संकट आले आहे. अशातच पोलीस दलातील ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना रस्त्यावर तैनात करण्यात येत नसल्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या होमगार्डनाही सेवा देण्यापासून नकार देण्यात आला आहे. त्यामुळे हे होमगार्ड बेरोजगार झाले आहेत. अकोला जिल्ह्यात ६७ पेक्षा अधिक होमगार्ड ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले आहेत. हे होमगार्ड सध्या बेरोजगार झाले आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील नोंदणीकृत होमगार्ड – ७६४
५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले – ६७
सध्या सेवेत असलेले होमगार्ड -६५०
जिल्ह्यात ७६४ होमगार्ड नोंदणीकृत आहेत. यापैकी ६४३ होमगार्डनी लसीकरण केले आहे. त्यामधील ५९४ होमगार्डचा पहिला डोस झालेला असून ३४८ होमगार्डचा दुसरा डोस झालेला आहे. तर ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या होमगार्डचे दोन्हीही डोस झालेले आहेत.
कोरोना या आजारामुळे ड्यूटी बंद झालेली आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह हा मोठा प्रश्न आहे. भाजीपाला व फळे विक्री करून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करीत आहे.
रवींद्र खंडारे
होमगार्ड वय ५४ वर्ष
५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या होमगार्डला ड्यूटी देण्यात येऊ नये असे निर्देश देण्यात आले आहे त्यामुळे मागील एक वर्षापासून ड्यूटी बंद आहे. मुलांच्या शिक्षणाचा तसेच दोन वेळच्या जेवणाचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
राजाराम पाटील
होमगार्ड वय ५३ वर्ष
ड्यूटी बंद असल्याने कुटुंबाचा गाडा चालविणे कठीण झाले आहे. काही समाजसेवींनी मदत दिली. तसेच पोलीस प्रशासनाकडूनही मदत मिळालेली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटातील हे वर्ष आम्ही जगू शकलो.
श्रीकृष्ण वक्ते
होमगार्ड वय ५३ वर्ष
शासनाच्या आदेशाचे पालन करीत ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या होमगार्डला ड्यूटी देण्यात येत नाही . मात्र त्यांचा उदरनिर्वाह चालावा यासाठी त्यांना पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. हा काळ उलटल्यानंतर या होमगार्डला पुन्हा ड्यूटीवर बोलावण्यात येणार आहे. सध्या ६५० पेक्षा अधिक होमगार्ड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. त्यांची सेवा पोलीस प्रशासनासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी खूप महत्त्वाची आहे.
मोनिका राऊत
अतिरिक्त पोलीस अधीक्षक तथा
जिल्हा समादेशक अकोला