अकोला– शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात संचारबंदीला शिथीलता देण्यात आली आहे. त्यामुळे महत्वाच्या ठिकाणी व बाजारपेठेत गर्दी वाढलेली निर्देशानात येत आहे. अशा परिस्थिती कोरोना ससंर्गाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविणे आवश्यक असून जिल्ह्यातील दुकानदार व व्यापाऱ्यांनी प्राधान्याने लसीकरण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात कोविड संदर्भांत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, बाल व माता संगोपन अधिकारी डॉ. आलोक चौधरी, जिल्हा परिषदचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.पी. पाटील, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता पाठक आदि उपस्थित होते.
संचारबंदी शिथील केल्यामुळे बाजारपेठेत गर्दी होत आहे. अशावेळी 45 वर्षावरील प्रत्येक दुकानदार, विक्रेते, फेरीवाले व व्यापारांनी प्राधान्याने लसीकरण करावे. तसेच शासनाव्दारे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना दि. 21 जून पासून लसीकरण मोहिम प्रारंभ होणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन लसीकरण न झालेल्या व्यक्तीने दि. 20 जूनपूर्वी लसीकरण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.