अकोला :– सहाय्यक कामगार आयुक्त, अकोला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आज सप्ताहाचा प्रारंभ करुन बाल कामगार प्रथा विरोधात जनजागृतीपर पोस्टरचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त राजु दे. गुल्हाने, निवासी जिल्हाधिकारी संजय खडसे, महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे, बाल न्याय मंडळचे सदस्य ॲड. संजय सेंगर, बाल कामगार समन्वयक पदमाकर सदाशिव, हर्षाली गजभीये, राघा जोशी आदि उपस्थित होते.
जिल्ह्यातील दुकाने, हॉटेल्स, व्यापारी संस्था, कारखाने व औद्योगीक आस्थापना मालकांनी, बाल कामगारांना कामावर ठेऊ नये, असे आढळून आल्यास त्याच्यांवर बाल कामगार सुधारणा अधिनियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी संबंधिताना दिले. तसेच बाल कामगार आढळून आल्यास तात्काळ कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले.
जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिवस (12 जून) निमित्याने जिल्ह्यात बाल कामगार प्रथा विरोधी सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये विविध आस्थापनांमध्ये बाल कामगार ठेवण्यात येऊ नये यासाठी आस्थापना मालकांकडुन बालकामगार कामावर ठेवणार नाही, असे हमी पत्र लिहुन घेण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने बालकामगारांचा शोध घेऊन त्यांचे पुनवर्सन करण्यात येणार आहे. माहितीपत्रकाव्दारे दुकाने व आस्थापनावर पोस्टरव्दारे जनजागृती अभियान राबविण्यात येईल. तसेच बाल कामगारांविषयी जनजागृती व्हावी याकरीता पोस्टर कॉम्पीटीशन, कलाकारांच्या नजरेतुन बालकामगार अशा विविध कार्याक्रमांसह ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. बाल कामगार व बालकासंबंधी अधिक माहितीकरीता चाईल्ड लाईन क्र.1098 या क्रमांकावर तर 8605095744 अथवा 7020410908 या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.