केरळात उशिरा का होईना पण गुरुवारपासून बरसू लागलेल्या मान्सूनने अचानक आपला वेग वाढवला असून, परिणामी, चार-पाच दिवस अगोदरच म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसांत तो तळकोकण, गोवा, तसेच कर्नाटकाच्या उर्वरित भागात बरसू लागणार आहे.
संपूर्ण केरळ एका दिवसात पादाक्रांत करीत मान्सूनने कर्नाटकच्या किनारपट्टीसोबतच दक्षिण व उत्तर कर्नाटक व्यापून टाकले. रविवार-सोमवारपर्यंत मान्सून महाराष्ट्राचा काही भाग, गोवा, तसेच कर्नाटक व तमिळनाडूच्या उर्वरित सर्व भागात तो पोहोचेल. आंध्रप्रदेशातील आणखी काही जिल्हे व्यापत तो तेलंगणात प्रवेश करेल. बंगाल उपसागरातही पुढे सरकणारा मान्सून दोन-तीन दिवसांत ईशान्य भारतात प्रवेश करेल.