यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद उपजिल्हा रुग्णालयातील क्वारंटाईन सेंटरमध्ये (Quarantine Center) एका कोरोनाबाधित रुग्णानं गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बळीराम मोतीराम राठोड असं या कोरोनाबाधित आत्महत्या केलेल्या रुग्णाचं नावं आहे. महागाव तालुक्यातील गुंज येथील रहिवासी असलेल्या राठोड यांनी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं पुसद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
खासगी रुग्णालयात भरपूर खर्च येत असल्यानं रुग्णाच्या नातेवाईकांनी बळीराम राठोड यांना पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणादेखील होत होती. मात्र, 3 जून रोजी रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान राठोड यांनी रुग्णालयातच गळफास घेत आत्महत्या केली.
रात्री राऊंडवर असणाऱ्या डॉक्टरांच्या ही बाब लक्षात आली. यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती पुसद शहर पोलिसांना देण्यात आली आहे. प्रकृतीत सुधारणा होत असतानाही राठोड यांनी आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.