अकोला– कोविड संदर्भात तिसरी संभाव्य लाट येण्याचे अनुमान वर्तविले जात आहे. या पार्स्व्हभुमिवर जिल्ह्यात उपचार सुविधांची निर्मिती, लसीकरण इ. कामे होत असतांनाच लहान बालके व त्यांचे पालक यांच्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृतीपर उपक्रम राबवा. प्रत्येक कुटुंबाला एक सुचना पत्रक व व्हिटामिन क च्या गोळ्यांचे पाकीट घरपोच पोहोच करा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज आरोग्य यंत्रणेस दिले.
जिल्ह्यातील कोविड १९ च्या सद्यस्थितीबाबत पालकमंत्री ना. कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी आ. नितीन देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. श्यामकुमार शिरसाम, डॉ. मुकुंद अष्टपुत्रे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात सद्यस्थितीत रुग्णसंख्या व पॉझिटीव्हीटी दरात घट होत आहे. ही चांगली बाब आहे. आता संभाव्य तिसऱ्या लाटेचे अनुमान असतांना सर्व कोविड केअर सेंटर्स सुसज्ज करणे, ऑक्सिजन उपलब्धता, औषधांची उपलब्धता करणे, आवश्यक खाटांची सुविधा, सर्व सुविधांनी युक्त रुग्णवाहिका आदी सेवांची सज्जता करण्याची कामे प्राधान्याने पूर्ण करावी. रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा हा उत्तम राखण्याबाबत खबरदारी घ्यावी.
तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभुमिवर लहान बालके व त्यांच्या पालकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी घरोघरी एक माहितीपत्रक व व्हिटामिन क च्या गोळ्यांचे पाकीट वाटप करावे. तसेच ग्रामीण भागात व मनपा हद्दीत सुनियोजित पद्धतीने प्रचार करुन प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी,असे निर्देश ना. कडू यांनी दिले. तसेच जिल्ह्यात दिव्यांगांचे लसीकरण व अन्य सामान्य नागरिकांचे लसीकरणाची सद्यस्थितीबाबतही आढावा घेण्यात आला.