अकोला – कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून कोरोना रुग्णांना चांगल्या प्रकारच्या उपचार सुविधा मिळावी या जनकल्याण हेतूने श्री. शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय येथे 30 खाटांचे छत्रपती शिवाजी महाराज कोविड केअर सेंटरचे लोकार्पण राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचे हस्ते आज करण्यात आले.
यावेळी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, कोविड केअर सेंटरचे संचालक डॉ. कुशल भाकरे, डॉ. अमोल रावणकर, डॉ. मनिष श्रीवास्तव, डॉ. ऋषीकेश कडू, डॉ. सोमवंशी, माजी प्राचार्य डॉ. विठ्ठलरावजी वाघ, डॉ. भुईभार आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. श्री. छत्रपती शिवाजी महाराज कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधेसह 30 खाटा उपलब्ध आहेत. या सुविधेमुळे कोरोना रुग्णांना उत्तम उपचार उपलब्ध होतील. भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जनहिताय कार्याप्रमाणे कोविड केअर सेंटर देखील कोरोना रुग्णांना उत्तम सेवा देईल, अशा शब्दात पालकमंत्री ना. कडू यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला.