राज्यातील बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळात बारावीच्या परीक्षा रद्द करण्यावर एकमत झालं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education)तर्फे घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10वी) च्या यंदाच्या परीक्षा यापूर्वीच रद्द करण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर आता उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी)च्या यंदाच्या परीक्षा रद्द करण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली की, विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. राज्य मंत्रिमंडळात बारावीच्या परीक्षा रद्द करण्यावर एकमत झालं असून आता या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवण्यात येणार आहे आणि त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.
राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. मंगळवारी (1 जून 2021) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता राज्य सरकारनेही महाराष्ट्रातील बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यावर एकमत झालं असून लवकरच अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल.
यापूर्वी इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचा तसेच विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी वाढीव वेळ देण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला होता. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता बारावीच्याही परीक्षा रद्द करण्याची चिन्ह दिसत आहेत.