अकोला – कोविड १९ च्या अनुषंगाने जिल्ह्यात आवश्यक ‘पॅरामेडीकल’ सेवांसाठी लागणारे मनुष्यबळ निर्मितीसाठी ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ अंतर्गत कौशल्य विकास विभागाद्वारे व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा सर्वोपचार रुग्णालयासह नामांकीत खाजगी हॉस्पिटल्स मधून ९०० युवक युवतींना प्रशिक्षित करण्याचे नियोजन आहे. या मनुष्यबळाचा वापर जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी होईल. हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.
यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कौशल्य विकास समितीची बैठक झाली व या बैठकीत अकोला जिल्ह्यासाठी आवश्यक अभ्यासक्रमांची निवड करण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या सह मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी संजय देशमुख, जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे एम.बी. बंडगर, सहाय्यक प्रशिक्षण अधिकारी एस. बी. घोंगडे, उपप्राचार्य आयटीआय एस.आर. ठोकळे, जिल्हा नियोजन अधिकारी शास्त्री तसेच खाजगी हॉस्पिटल्सचे व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
या बैठकीचे प्रास्ताविक सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र द. ल. ठाकरे यांनी केले. त्यांनी माहिती दिली की, राज्यशासनाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविला आहे. त्याअंतर्गत कोविड उपचार करतांना वैद्यकीय प्रशिक्षित मनुष्यबळाचा जाणवणारा तुटवडा भरुन काढण्यासाठी अकोला जिल्ह्याला आवश्यक मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यात येणार असून प्रशिक्षणानंतर त्यांना लगेचच विविध वैद्यकीय संस्थांमध्ये विविध पदांवर नियुक्ती दिली जाणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील युवक युवतींना प्रत्यक्ष हॉस्पिटल,मेडीकल कॉलेज येथे प्रशिक्षण दिले जाईल. या कार्यक्रमात ज्या हॉस्पिटल मध्ये २० पेक्षा अधिक खाटांची सोय आहे असे खाजगी हॉस्पिटल्सही सुचिबद्ध होऊन सहभागी होऊ शकतील.
या कार्यक्रमाद्वारे दिले जाणारे प्रशिक्षण हे उमेदवार युवक युवतींसाठी पूर्णपणे विनामूल्य असेल. ज्या सुचिबद्ध संस्था हा प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवतील त्या संस्थांना टप्पेनिहाय महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी प्रशिक्षण शुल्क अदा करेल.
सद्यस्थितीत अकोला जिल्ह्यातील वैद्यकीय सेवांसाठी १५ प्रकारचे अभ्यासक्रम निवडण्यात आले असून त्यात प्रयोगशाळामध्ये सहायक तंत्रज्ञ, वैद्यकीय उपकरणे हाताळणी सहायक, रुग्ण सेवक, स्वागतक, रुग्णालय स्वच्छता सहायक, आरोग्यसेवा गुणवत्ता नियंत्रक, माता व बाल आरोग्य सेविका, सामान्य सहायक ते रुग्णवाहिका चालक असे विविध अभ्यासक्रम यात समाविष्ट आहेत.
एका बॅचमध्ये एका अभ्यासक्रमाला किमान पाच ते ३० उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे. या कार्यक्रमात रुग्णालयांना सहभागी व्हायचे असेल तर त्यांच्यासाठी गुगल फॉर्मच्या माध्यमातून प्रशिक्षण संस्था नोंदणीसाठी आपली नोंदणी करावयाची आहे.
तर इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांनाही गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपली नोंदणी करता येणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णालयांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी पापळकर यांनी आज केले.
अधिक माहितीसाठी संपर्कः मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण्कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत अधिक माहितीसाठी – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला येथे ०७२४-२४३३८४९ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा,असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला द. ल. ठाकरे यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या समन्वयक श्रीमती सुनिता गोळे (भ्रमण ध्वनी-८३२९२८४७८२) या आहेत.