सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्यानं त्याचा परिणाम भारतीय बाजारातही दिसू लागला आहे. अमेरिकन डॉलरच्या मूल्यात झालेली घसरण आणि महागाईची चिंता यामुळे मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा ४९ हजार ४८४ रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याच्या दरात ०.२० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
काल सोन्याचा दर प्रति १० ग्रॅममागे ४९ हजार ३४९ रुपये इतका होता. आता त्यात १३५ रुपयांची वाढ झाली आहे. डॉलरचं मूल्य घसरल्यानं सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली आहे. सोन्यासोबतच चांदीचे दरदेखील वाढले आहेत. काल एक किलो चांदीचा दर ७१ हजार ८९८ रुपये इतका होता. आज त्यात जवळपास ८०० रुपयांची वाढ झाली. चांदीचा दर आता किलोमागे ७२ हजार ६६८ रुपयांवर पोहोचला आहे.
डॉलरची घसरण आणि महागाई वाढण्याची शक्यता याचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर झाला आहे. त्यामुळे सोन्यानं गेल्या ५ महिन्यांतील उच्चांकी दर गाठला आहे. कोरोना संकट कायम असल्यानं लोक सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत. सोन्यातील गुंतवणूक पारंपरिक स्वरुपाची मानली जाते. भारतीय गुंतवणूकदार याकडे सुरक्षित गुंतवणूक पाहतात. कोरोनाचं संकट कायम असल्यानं सोन्याकडे असलेला ओढा कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सोन्याचे दर वाढू शकतात.