जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला अंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. अकोला तर्फे वैयक्तिक व्याज परतावा योजनेअंतर्गत दोघा लाभार्थ्यांना व्यावसायिक ट्रॅक्टर चे वितरण आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला यांच्यातर्फे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ च्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत दोघा लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते लाभार्थी संजय देशमुख व गजेंद्र मते या दोघांना व्यावसायिक ट्रॅक्टर च्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र द. ल. ठाकरे, जिल्हा समन्वयक अण्णासाहेब पाटील महामंडळ, अकोला रोहित बारस्कर तसेच महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीचे वितरक तसेच कोटक महिंद्रा बँकचे अधिकारी उपस्थित होते.
अशी आहे योजनाः-
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत वैयक्तिक व्याज परतावा योजने अंतर्गत लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज दिले जाते. त्यासाठी कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाची परतफेड करतांना व्याजाची रक्कम पाच वर्षांसाठी १२ टक्के मर्यादेत अथवा तीन लाख रुपयांच्या मर्यादेत ही महामंडळातर्फे लाभार्थ्यांच्या वैयक्तिक बचत खात्यात परतावा केली जाते.
याच योजनेत गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकत्र येऊन सुरु केलेल्या उद्योग व्यवसायासाठी सुद्धा पाच वर्षांपर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, जास्तीत जास्त १२ टक्के व्याज किंवा १५ लाख रुपयांच्या मर्यादेत व्याजाची रक्कम दरमहा महामंडळामार्फत गटाच्या बॅंक खात्यात जमा केली जाते.
अकोला जिल्ह्यातील स्थितीः-
अकोला जिल्ह्यात आतापर्यंत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत्र ६५७ उमेदवारांची ऑनलाईन नोंदणी झालेली असून योजनेचे उद्दिष्ट्य जिल्ह्यासाठी २४५ असून महामंडळामार्फत २५२ जणांना पात्रता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यापैकी बॅंकांनी १३६ प्रकरणे मंजूर केली असून ४० प्रकरणे प्रलंबित आहेत. मंजूर प्रकरणांपोटी बॅंकांनी लाभार्थ्यांना विविध व्यवसायांसाठी ७ कोटी २६ लक्ष २७ हजार ३४५ रुपये रक्कम वितरीत केली आहे. तर महामंडळामार्फत आतापर्यंत ५९ लाख १९ हजार ५८३ रुपये व्याज परताव्यासाठी लाभार्थ्यांच्या वैयक्तिक बचत खात्यात वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा समन्वयक रोहीत बारस्कर यांनी दिली आहे.