नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड (CBSE) आणि आयसीएसई बोर्डाच्या (ICSE) 12 वी च्या परीक्षा रद्द कराव्या या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सोमवारी सुनावणी झाली. देशातील हजारो विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेल्या या याचिकेवर सोमवारी देखील कोणताही ठोस निर्णय झाला नाही. आता या प्रकरणातील सुरुवाणी 3 जून (गुरुवार) रोजी होणार आहे. देशातील कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे ही परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
ममता शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर केंद्र सरकारच्या वतीनं अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी युक्तीवाद केला. या प्रकरणात केंद्र सरकार दोन दिवसांमध्ये अंतिम निर्णय घेईल, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला गुरुवारपर्यंत वेळ द्यावा अशी विनंती वेणुगोपाल यांनी केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करत सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली.
काय आहे याचिका?
ममता शर्मा यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोरोनाच्या व्हायरसच्या महामारीत बारावीची परीक्षा ऑफलाइन किंवा ऑनलाइन घेणे शक्य नाही. या परीक्षेचा निकाल उशीरा जाहीर झाल्या परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण होईल आणि त्यांच्या भवितव्याचे कधीही भरून न येणारे नुकसान होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे परीक्षा रद्द करून मर्यादित वेळेत वस्तुनिष्ठ पद्धतीने बारावीचा निकाल जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला द्यावेत, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेत शर्मा यांनी केंद्र सरकार, सीबीएसई, आयसीएसई बोर्ड यांना पक्षकार करण्यात आले आहे.
परीक्षा लांबल्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकार नेमका कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.